दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्क मैदान (शिवतीर्थ) मिळावे यासाठी गेल्या वर्षी शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे गटांमध्ये चांगलीच जुंपल्याने मुंबईत तणाव वाढला होता. त्यामुळे यंदा ठाकरे गटाने दीड महिना आधी परवानगीकरिता मुंबई महापालिकेला पत्र दिले आहे. ठाकरे गटाच्या पत्रानंतर शिंदे गटाने पत्र दिले असल्याचे समजते. यावरून पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेतील फुटीनंतर गतवर्षी दसरा मेळाव्यावरुन ठाकरे व शिंदे गटात जुंपली होती. ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ठाकरे गटाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने ठाकरे गटाला परवानगी दिल्याने शिंदे गटाला वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर मेळावा घ्यावा लागला. या वादाची पुनरावृत्ती यंदाही होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटाने पालिकेला पत्र दिले असून परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचे ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी सांगितले. तर, आम्ही शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी पत्र दिल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

हेही वाचा >> शिवाजी पार्क मैदानातील दसरा मेळावा ठाकरे – शिंदे गट पुन्हा समोरासमोर

यावरून शंभूराज देसाई यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचा होतो. आज तारखेला नियमाने, कायद्याने पक्षाला मान्यता देण्याचं, त्यांचं चिन्ह निश्चित करण्याचे अधिकार घटनेने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. त्या निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना ही अधिकृत शिवसेना असल्याचं म्हटलं आहे. शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवेसनेला शिवसेनेचं पारंपरिक धनुष्यबाण चिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे आजपर्यंत जसं धनुष्यबाण चिन्ह असलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होत होता, तसाच शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील अधिकृत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर व्हावा याकरता आम्ही सर्व कागदपत्र स्थानिक महानगरपालिका प्रशासनाकडे अर्ज केला आहे. कायद्याच्या बाजू तपासून, अधिकृत बाजू कोणाची आहे हे तपासून आम्हाला परवानगी मिळेल याची खात्री आहे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whose dussehra gathering will be held in shivaji park shambhuraj desai said as of today sgk
Show comments