काँग्रेसचा सवाल ; हेमंत करकरे यांनी चौकशीनंतर काढलेले निष्कर्ष जाहीर करण्याचे आव्हान
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या अटकेनंतर चिंता व्यक्त करणारे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी हेमंत करकरे आणि गृह मंत्रालयाच्या अन्य अधिकाऱ्यांनी सत्य समोर मांडल्यावर मौन का बाळगले होते, असा सवाल काँग्रेसने केला.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या विरोधातील ‘मोक्का’ कायद्याची कलमे काढून घेण्यात आली. तसेच चौकशी करणारे तत्कालीन पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार केले जात आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या करकरे यांना पद्धतशीरपणे अवमानित केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत केला. करकरे यांनी चौकशी केलेले सारे निष्कर्ष केंद्र व राज्य सरकारने जाहीर करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. स्वाध्वी प्रज्ञासिंग व कर्नल पुरोहित आदी आरोपींच्या अटकेनंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी चिंता व्यक्त केली. अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि हेमंत करकरे यांनी अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन सारी वस्तुस्थिती सादर केली होती. या भेटीनंतर अडवाणी यांनी तपासाबाबत मतप्रदर्शन करण्याचे टाळले होते याकडे मोहन प्रकाश यांनी लक्ष वेधले. करकरे आणि अन्य अधिकाऱ्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांनाही कटाची माहिती व पुरावे सादर केले होते. दहशतवादीविरोधी पथकाच्या तपासाबाबत भाजपकडून प्रश्नचिन्ह केले जात असल्याबद्दलही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.