कुख्यात गुंड छोटा राजन याच्याशी वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी संपर्क साधून दूरध्वनीद्वारे त्याच्या मुलाखती घेऊ शकतात तर पोलिसांनाच त्याचा ठावठिकाणा कसा कळत नाही, अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने पोलिसांच्या अजब दाव्याबाबत मंगळवारी आश्चर्य व्यक्त केले.
पुणे येथील शिवसेनेचे नगरसेवक अजय भोसले यांच्यावर २००९ मध्ये दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. राजनने सुपारी घेऊन हा हल्ला केल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. मात्र प्रकरणाचा पोलिसांतर्फे योग्यप्रकारे तपास केला जात नसल्याचा दावा करीत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस राजनचा ठावठिकाणा कळत नसल्याचा अजब दावा पोलिसांकडून करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.
भोसले यांनी याचिका करताच पुणे पोलिसांनी मोहम्मद रफीक शेख याला अटक केली, तर राजेश यादव या उत्तर प्रदेशमधील तुरुंगात बंदिस्त असलेल्या कैद्याच्या नावे वॉरंट बजावले होते. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार छोटा राजन आणि विजय शेट्टी हे या प्रकरणी फरारी आहेत, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला दिली. तसेच राजनचा ठावठिकाणा माहीत नसल्याचा दावाही केला. दरम्यान, न्यायालयाने पुणे गुन्हे अन्वेषण विभागाला चार आठवडय़ांत अतिरिक्त तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भोसले यांच्यावर हल्ला करण्यात आला त्या वेळी त्यांना दुखापत झाली नव्हती पण त्यांचा चालक जखमी झाला होता. या प्रकरणी तक्रार नोंदविताना आपल्या एका हितशत्रूने आपल्यावरील हल्ल्याची सुपारी राजनला दिल्याचा आरोप केला होता.
पोलिसांनाच छोटा राजनचा ठावठिकाणा कसा लागत नाही?
कुख्यात गुंड छोटा राजन याच्याशी वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी संपर्क साधून दूरध्वनीद्वारे त्याच्या मुलाखती घेऊ शकतात तर पोलिसांनाच त्याचा ठावठिकाणा कसा कळत नाही,
First published on: 04-09-2013 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why cant police trace chhota rajans whereabouts wonders bombay high court