गेल्या आठवड्यात रविवारी रात्री पडलेल्या पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. चुनाभट्टी, वडाळा परिसरात रेल्वे वाहतूक बंद पडली. रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक वळवावी लागली. जेथे अशी परिस्थिती उद्भवली त्या ठिकाणांची पाहणी करून भविष्यात असे घडू नये म्हणून उपाययोजना करा, यंत्रणा सज्ज ठेवा असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई शहर आणि उपनगरे यांची आढावा बैठक गुरुवारी झाली. यावेळी पाण्याचा निचरा संथ गतीने होत असलेल्या भागांत अधिक पंप बसवावेत किंवा अधिक क्षमतेचे पंप बसवावेत. महानगरपालिकेने सुमारे ४०० ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप पावसाळ्यापूर्वीच बसविले आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ, पाणी उपसा करणारे पंप, तसेच पंप नेण्यासाठीची टोईंग व्हॅन इत्यादी व्यवस्था तत्पर ठेवावी. पंपासाठी वीज वितरण कंपन्यांकडून थेट जोडणी घ्यावी व डिझेल जनरेटर हे पर्यायी ठेवावेत. पाण्याचा निचरा संथ गतीने झालेल्या रेल्वे मार्गाची महानगरपालिकेचे अधिकारी आणि रेल्वेचे अभियंते व अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करावी, अशा सूचना डॉ. जोशी आणि सैनी यांनी या बैठकीत दिल्या.
हेही वाचा – गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प : पंतप्रधानांच्या हस्ते जुळ्या बोगद्याचे उद्या भूमिपूजन
हेही वाचा – मुंबई : प्रशासक नेमण्याच्या कारवाईपासून पेंढारकर महाविद्यालयाला तूर्त दिलासा
या बैठकीला दोन्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या अध्यक्षांसह महानगरपालिकेचे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, सह आयुक्त (वाहतूक शाखा, मुंबई पोलिस) अनिल कुंभारे यांसह आपत्कालीन व्यवस्थापन, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक , मध्य आणि पश्चिम रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई अग्निशमन दल, बेस्ट, वीज वितरण कंपन्या, म्हाडा आदी प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.