मुंबई : कामाचे वाढते तास, बदलती जीवनशैली, व्यसनांचे वाढते प्रमाण, अवेळी खाणे आदी विविध कारणांमुळे तरुणांमध्ये शारीरिक, तसेच मानसिक व्याधीचे प्रमाण वाढत असून, यातूनच उच्च रक्तदाबाच्या विकाराला सुरुवात होते. उच्च रक्तदाब हे जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक बनले आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
सतत एका जागी बसून काम केल्यामुळे तरुणांच्या शरीराची हालचाल मंदावतात. त्यामुळे, उच्च रक्तदाबाची समस्या बळावत आहे. वयाच्या पंचविशीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या जडत असल्याचे निदर्शनास आले आहे. उत्पादन क्षेत्र कमी होऊन, सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान संक्षम सेवेसह (बीपीओ) विविध क्षेत्रांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. पोषक आहाराचा अभाव, कामांचे वाढते तास आदींमुळे निद्रानाश, वारंवार छातीत दुखणे, ताणतणाव वाढत आहेत आणि या समस्येचे रुपांतर पुढे हृदयविकारात होत आहे. तसेच, तरुणांमधील व्यसनांच्या वाढत्या प्रमाणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो आणि त्याचा परिणाम डोळे, हृदय आणि मूत्रपिंडावर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या दहा वर्षांत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, त्यात पंचवीस ते तीस वयोगटातील रुग्णांचा समावेश असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
उच्च रक्तदाबाची लक्षणे तात्काळ लक्षात येत नाहीत. मात्र हृदय, डोळे, किडनी, मेंदूवर त्याचा परिणाम होतो. यामुळेच हृदयविकाराचा झटका येणे, किडनी निकामी होणे, अंधत्व येते, असेही डॉक्टरांनी सांगितले.