मुंबई : पंजाबमधील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांनी उपोषण सोडावे यासाठी सोमवारी (२० जानेवारी) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.
घनवट म्हणाले, शेती व्यवसायातील अनिश्चितता व असुरक्षितता पाहता शेतकरी संघटनांनी उत्पन्नाची हमी मागितली आहे. त्यासाठी, कोणीही किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करू नये, असा कायदा करण्यात यावा. शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. पण, केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही. पंजाबच्या आंदोलनातील सर्व मागण्यांना सर्व शेतकरी संघटना समर्थन देऊ शकत नसल्या तरी केंद्र सरकारचा निषेध मात्र नक्की करायला हवा. यासाठी स्वतंत्र भारत पक्षातर्फे आज, सोमवारी (२० जानेवारी) सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात सर्व शेतकरी संघटना, सर्व पक्ष व शेतकरी हितेशी चळवळींनी भाग घ्यावा.