अनधिकृत बांधकाम तोडणारे मुंबई महापालिकेचे अभियंते मोहन फड यांना दोन महिन्यांपूर्वी मनसेचे आमदार राम कदम यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या फड यांना आठवडाभर रुग्णालयात रहावे लागले होते. त्यावेळी जाहीरपणे राम कदम यांनी मारहाणीचे समर्थन करत परत मारू अशी होर्डिग्ज लावली होती. त्यावेळी पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह का गप्प बसून होते असा सवाल पालिकेतील अभियंत्यांकडून आता केला जात आहे.
पोलीस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याबरोबर त्याची तात्काळ दखल घेऊन पोलीस महासंचालक दयाळ यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी जातात. मात्र अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या अभियंत्याला मारहाण होते तेव्हा गुन्हा नोंदविण्यापलीकडे कदम यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांकडून पुढाकार का घेतला गेला नाही, अस सवाल ज्येष्ठ अभियंत्यानी उपस्थित केला आहे. मुंबईत रोजच्या रोज अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहात आहेत. त्यांच्याविरुद्ध पालिका अधिकाऱ्यांनी हिमतीने कारवाई केली तर त्यांना संरक्षण द्यायचे नाही, हेच आजपर्यंत पोलिसांचे धोरण राहिले आहे, असा आरोप अभियंत्यांनी केला आहे.