प्राध्यापकांनी आंदोलन करून विद्यार्थ्यांना गेले दोन महिने वेठीला धरले असताना, आंदोलन होतेच कुठे, परीक्षा गुरूवारपासून सुरू झाल्या असताना आधीच्या ५५ दिवसांच्या काळातील पगार कापण्याची कारवाई सरकार कशी करू शकते? प्राध्यापकांना ही शिक्षा का? असा सवाल ‘एमफुक्टो’ चे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केला. संघटना या मुद्दय़ावर उच्च न्यायालयातही धाव घेण्याची शक्यता आहे.
संपकरी प्राध्यापकांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने पगार कापण्याचे हत्यार उपसले असले तरी संघटना आपल्या मागण्यांवर तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाहीत. यासंदर्भात संघटनेशी संपर्क साधला असता पाटील म्हणाले, गेल्या ५५ दिवसांत प्राध्यापकांनी आपले नियमित काम केले आहे आणि पगार त्याचाच दिला जातो. परीक्षेच्या कामासाठी प्राध्यापकांचा असहकार आहे. परीक्षा गुरूवारपासून सुरू झाल्या असताना आधीच्या काळातील पगार कापणे योग्य नाही.