मुंबई : बारदान (पोती) नसल्यामुळे पंधरा दिवसांपासून सोयाबीनची खरेदी बंद आहे. ६ जानेवारीपर्यंत उद्दिष्टच्या जेमतेम २९ टक्केच खरेदी झाली आहे. खरेदीपोटी नाफेडकडे शेतकऱ्यांचे १५० कोटी रुपये थकले आहेत. सोयाबीनमधील ओलाव्यासह अन्य कारणांनी पहिल्या दिवसापासूनच सोयाबीन खरेदीत गोंधळ सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ५० लाख हेक्टरवर गेले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. पण, खासगी बाजारात सोयाबीनची जेमतेम चार हजार रुपये दराने विक्री सुरू झाली आहे. शेतकरी नुकसान टाळण्यासाठी हमीभावाने विक्री करण्यासाठी धडपडत आहेत. सहा जानेवारी अखेर राज्यातील एकूण ७ लाख ४४ हजार ७५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. २ लाख ६ हजार ९९० शेतकऱ्यांकडून ४ लाख २६ हजार ०८७ टन सोयाबीन खरेदी करण्यात आला आहे. केवळ सोयाबीन भरण्यासाठी पोती (बारदाणा) नाहीत म्हणून गत १५ दिवसांपासून खरेदी रखडली आहे. इतका अनागोंदी कारभार नाफेडकडून सुरू आहे. सोयाबीन खरेदी पोटी शेतकऱ्यांना देय असलेली सुमारे १५० कोटी रुपयांची रक्कमही नाफेडकडे थकली आहे.

हे ही वाचा… Maharashtra Breaking News LIVE Updates: दिल्लीत आप व काँग्रेस आमनेसामने, ठाकरे गट कुणाच्या पाठिशी? संजय राऊत म्हणाले…

हमीभावाने सोयाबीन खरेदीचा बोजवारा उडाल्याची गंभीर दखल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेऊन बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत रावल यांनी पणन मंडळ आणि नाफेडच्या गोंधळी कारभारची झाडाझडती घेतली. सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी आणि प्रत्यक्ष विक्रीला ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या ३० दिवसांत केंद्र सरकारने दिलेले १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्टे पूर्ण करा. शेतकऱ्यांचे थकलेले १५० कोटी तीन दिवसांत द्या. त्यानंतर होणाऱ्या खरेदीचे पैसे दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. बारदाणे (पोती) १४ जानेवारीपर्यंत उपलब्ध होतील. पण, त्याची वाट पाहू नका. शेतकऱ्यांकडील उपलब्ध असलेल्या बारदाण्यातून खरेदी सुरू करा, असे आदेश मंत्री रावल यांनी दिले आहेत.

राज्यातील सोयाबीनचे क्षेत्र – ५० लाख हेक्टर.
हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी – ७ लाख ४४ हजार ७५७ शेतकरी.
खरेदी केलेले शेतकरी- २ लाख ६ हजार ९९०.
एकूण खरेदी केलेले सोयाबीन – ४ लाख २६ हजार ०८७ टन.
नाफेडकडे थकीत रक्कम – १५० कोटी.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why soyabean purchase objective failed farmers in trouble mumbai print news asj