Bomby High Court : लॉक अपमध्ये ठेवताना आरोपीचे कपडे काढण्याची गरज काय? या विषयी उत्तर द्या असे आदेश आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या सातरस्ता येथील लॉक अपमध्ये चौकशी दरम्यान आरोपीचे कपडे काढण्यात आले होते. त्यामागे पोलिसांचा नेमका काय हेतू होता? याची माहिती सादर करा असं सांगत या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
नेमकं हे प्रकरण काय?
मुंबईतल्या ताडदेव भागात राहणाऱ्या एका शिक्षकावर विनयभंगाचा आरोप आहे. त्यासाठी या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तेव्हा त्याचे कपडे काढले. या विरोधात या शिक्षकाच्या पत्नीने याचिका दाखल करत न्यायालयाकडे दाद मागितली होती. आता न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांनी असं का केलं? याचं उत्तर मागितलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या प्रकरणी संबंधित शिक्षकाला दोन लाखांची भरपाई देण्याचाही निर्णय दिला होता. यानंतर ज्या पोलिसांनी या शिक्षकाला कपडे काढायला सांगितलं त्यांच्या पगारातून भरपाईची रक्कम दिली गेली आहे असं सरकारने कोर्टाला सांगितलं आहे.
जून महिन्यात तक्रार
गेल्या वर्षी जून महिन्यात एका विद्यार्थिनीने अशी तक्रार केली होती की तिच्या शिक्षकांनी तिचा विनयभंग केला. या प्रकरणात FIR दाखल झाल्यानंतर जुलै महिन्यात या प्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याचे कपडे काढण्यात आले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. आता या प्रकरणात जेव्हा शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं तेव्हा त्याचे कपडे का काढले याचं उत्तर देण्यास कोर्टाने सांगितलं आहे.