मुंबई : राज्यातील उसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. गाळप सुरू केलेल्या २०० पैकी १८९ कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली आहेत. मार्चअखेर ८० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गाळप, साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. अंदाजापेक्षा सुमारे नऊ लाख टनांनी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
राज्याचा साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. यंदाच्या गळीत हंगामात ९९ सहकारी आणि १०१ खासगी, अशा एकूण २०० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. या कारखान्यांनी दैनंदिन नऊ लाख टन क्षमतेने मार्चअखेर सुमारे ८४६ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ९.४६ टक्के साखर उताऱ्याने सुमारे ८० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. मार्चअखेर २०० पैकी १८९ कारखान्यांनी गाळप हंगाम संपवून धुराडी बंद केली आहेत.
गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. राज्यात सध्या केवळ अकरा कारखाने सुरू असून, येत्या दहा दिवसांत हंगाम बंद होण्याचा अंदाज आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी कृषी विभागाने ९० लाख टन, राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाने ८५ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशने (विस्मा) ९० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. पण, हंगामअखेर इथेनॉलसाठी वापरलेली साखर वगळून निव्वळ साखर उत्पादन ८१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे.
दहा लाख टनांवर घट
राज्यातील गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. आगामी दहा दिवसांत हंगाम बंद होईल. निव्वळ साखर उत्पादनात अंदाजापेक्षा आठ – नऊ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.