व्यावसायिक असलेली आपली पत्नी सतत घराबाहेर असते, डिस्को-पबला जाते आणि मुलाकडे लक्ष देत नाही, असा आरोप करत तिची वागणूक ही क्रूरता असल्याचा दावा करणाऱ्या पतीला उच्च न्यायालयाने चपराक लगावली. पत्नीचे पब वा डिस्कोला जाणे ही क्रूरता ठरू शकत नाही. त्यामुळे त्या मुद्दय़ावरून काडीमोड मागता देता येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली.
गेल्या १६ वर्षांपासून हे दाम्पत्य विभक्त राहत आहे. परंतु तरी पतीने ज्या कारणांवरून घटस्फोटाची मागणी केली, ती क्रूरता होऊ शकत नसल्याचे नमूद करून फेटाळून लावले आणि या दाम्पत्याचे २० वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणण्यास नकार दिला. पत्नी-पत्नीतील विसंगती ही काही क्रूरता होत नाही. म्हणूनच अशा मुद्दय़ांवरून घटस्फोट देणे शक्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
१९९४ मध्ये या दाम्पत्याचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगा आहे. १९९८ मध्ये हे दाम्पत्य वेगळे राहू लागले. पण मुलाला पतीने स्वत:कडे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पत्नीची आपल्याप्रती असलेली वागणूक क्रूर असल्याचा दावा करत पतीने १९९९ मध्ये घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला होता. पत्नी कमालीची उर्मट आहे, सतत घराबाहेर राहायला तिला आवडते, वारंवार पार्टी-डिस्को-पबला जाते, मुलाकडे दुर्लक्ष करते, फुलदाणी फेकून मारते, असे आरोप पतीने केले होते. परंतु कुटुंब न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पत्नी पब आणि डिस्कोला जात असल्याची बाब उघडकीस आली. परंतु तीच नव्हे तर पतीही पब-डिस्कोला जात असल्याचे उघड झाले. पतीने ज्या घटनांचा दाखला देत पत्नीचे वर्तन क्रूरता म्हटलेले आहे. त्याबाबत भाष्य करताना नात्यातील कोरडेपण आणि आपुलकीचा अभाव ही क्रूरता ठरू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा