मुंबई : शहरी भागातील वायफाय क्रांती आता खेडय़ापाडय़ांत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील खेडेगावांतील शिधावाटप दुकानांमध्ये इंटरनेट- वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या दुकानाच्या परिसरात येऊन लोकांना माफक दरात इंटरनेट वापरता येणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
देशात इंटरनेटचा वापर वाढत असताना ग्रामीण भागातील इंटरनेटची घनता शहरी भागातील इंटरनेट घनतेच्या फक्त एकतृतीयांश आहे. त्यामुळे शहरांप्रमाणे खेडय़ापाडय़ांतील लोकांनाही इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्राच्या पीएम-वाणी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशातील १० जिल्हे, उत्तराखंडची राजधानी डेहराडून, आंध्र प्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यातील शिधापाटप दुकानांतून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.