मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचे पालकत्व घेता येणार असून वाघ, सिंहाचे वर्षभराचे पालकत्व मिळण्यासाठी साधारण तीन लाख, तर बिबट्यासाठी दीड लाख रुपये रुपये मोजावे लागणार आहेत.उद्यानातर्फे वन्य प्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. या योजनेनुसार वाघ ३ लाख १० हजार, सिंह ३ लाख, बिबट्या १ लाख २० हजार, वाघाटी ५० हजार, नीलगाय ३० हजार आणि हरिण २० हजार रुपये भरून वर्षभरासाठी दत्तक घेता येईल. यापूर्वी मंत्री रामदास आठवले यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्या दत्तक घेतला होता. तसेच सामाजिक कार्यकर्त्या साधना वझे या अनेक वर्षे बिबट्याला दत्तक घेत आहेत. याचबरोबर प्रताप सरनाईक, अभिनेता सुमित राघवन यांनीही प्राणी दत्तक घेतले आहेत. तसेच २०२१ मध्ये दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचाही दत्तक योजनेत सहभाग होता.

हेही वाचा >>> अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुन्हा चुकला; बुधवारपासून शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा नवा अंदाज

वन्य प्राण्यांच्या आहार, उपचारांवरील खर्चासाठी तसेच मानवी साखळीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या वन्य प्राण्याविषयी शहरवासीयांची जवळीक वाढावी या उद्देशाने बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. वन्यप्राणी दत्तक येजनेअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांच्या प्रजाती एक वर्षांच्या करारावर दत्तक घेता येतात. वर्षभर प्राण्यांचा आहार व उपचाराचा खर्च दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो. केवळ आर्थिक मदतीपुरती ही योजना मर्यादित नाही. यामुळे वन्यजीवांविषयी सामान्य माणसांनाही प्रेम, आपुलकी वाटेल असा उद्देश आहे. तसेच एखादा वन्यप्राणी दत्तक घेतल्यास त्या व्यक्तीला त्याचे पालकत्व स्विकारल्याचे प्रमाणपत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे देण्यात येते. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फलक त्या प्राण्याच्या पिंजऱ्याजवळ लावला जातो. तसेच आठवड्यातून एकदा कुटुंबासह त्या प्राण्याची नि:शुल्क पाहणी करता येते. या योजनेअंतर्गत सिंह, वाघ, वाघाटी, बिबट्या, नीलगाय, भेकर, सांबर आणि चितळ या वन्यजीवांचा समावेश आहे.

कोणते, किती प्राणी दत्तक ?

सिंह- २

वाघ- ६

बिबट- १९

वाघाटी- २

चितळ- ३६

निलगाय- १