पाच वर्षांत अवघ्या १६ प्राणीप्रेमींकडून पालकत्व

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांच्या देखभालीचा खर्च भागवण्याच्या हेतूने पाच वर्षांपासून राबवण्यात येत असलेली वन्य प्राणी दत्तक योजनाच आता पोरकी झाल्याचे चित्र आहे. सुरुवातीला अनेक नामवंतांसह सर्वसामान्य प्राणीप्रेमींनी सहभाग दर्शवलेल्या या योजनेत प्राण्यांचे पालकत्व घ्यायला पुढे येणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकीच आहे. गेल्या पाच वर्षांत अवघ्या १६ जणांनी या योजनेंतर्गत प्राणी दत्तक घेतले आहे. त्यामुळे आता ही योजनाच गुंडाळण्याची वेळ वनअधिकाऱ्यांवर आली आहे.

राष्ट्रीय उद्यानात पिंजराबंद असणाऱ्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी २०१४ मध्ये प्रशासनातर्फे वन्यजीव दत्तक योजनेला सुरुवात करण्यात आली होती. याअंतर्गत सफारी, बचाव केंद्र (रेस्क्यू सेंटर) आणि दर्शन पिंजऱ्यांमध्ये असलेल्या वाघ, सिंह, बिबटय़ा, भेकर, गंज ठिपके मांजर, चितळ आणि निलगाय या प्राण्यांना दत्तक घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. सुरुवातीला या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र थोडय़ा कालावधीतच योजनेला मरगळ आली. प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या प्राणिप्रेमींची संख्या घटली. शिवाय दत्तक करार संपुष्टात आल्यानंतर त्याच्या नूतनीकरणासाठी हात वर करणाऱ्या काही दत्तकधारकांमुळे योजनेला मरगळ आल्याचे चित्र दिसत आहे. दत्तकधारकाने दिलेले दत्तकमूल्य हे त्या प्राण्याच्या पालनपोषणासाठी खर्च केले जातात. मात्र प्राण्यांना नव्याने दत्तक घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून एक वर्षांचा दत्तक करार संपुष्टात आल्यानंतर दत्तकधारक त्याच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती उद्यानातील एका अधिकाऱ्याने दिली.

गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिबटय़ा बचाव केंद्रातील ‘भीम’ नामक बिबटय़ाला दत्तक घेतले होते.

या बिबटय़ाच्या दत्तक कराराचे आठवले यांनी २०१८ मध्ये नूतनीकरण केले असून गेल्या सात महिन्यांमध्ये केवळ एका बिबटय़ाला दत्तक घेतल्याची माहिती त्या अधिकाऱ्याने दिली.

तसेच अहमदनगर येथून आलेल्या सूरज आणि तारा या सात महिन्यांच्या बिबटय़ांच्या पिल्लांना दत्तक घेण्यासाठी एका मराठी कलाकाराने विचारणा केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा पद्धतीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दत्तक योजनेसाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पालकांची घटती संख्या

२०१४ पासून आजतागायत केवळ  १६ जणांनी योजनेंतर्गत १९ वन्यप्राण्यांना दत्तक घेतले आहे. यामध्ये सिंह, वाघ, बिबटय़ा, भेकर, गंज ठिपके मांजर, चितळ या प्राण्यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये १०, २०१५ मध्ये ४, २०१६ मध्ये २, २०१७ मध्ये २ आणि २०१८ मध्ये एका (जुलैपर्यंत) वन्यप्राण्याला दत्तक घेतले गेले आहे. सध्या उद्यानात पिंजराबंद अवस्थेत १८ चौसिंगे, ३ सिंह, ७ वाघ, ११ बिबटे, ४ गंज ठिपके मांजर, ३८ चितळ आणि २ नीलगाय आहेत. हे सर्व वन्यजीव योजनेंतर्गत दत्तक घेण्यासाठी उपलब्ध आहेत.

Story img Loader