मुंबई : काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील घणसोली येथील जंगल क्षेत्रात संरक्षित सापाची प्रजात हातळल्याबद्दल दोन परदेशी इन्फ्लूएंजरची तक्रार महाराष्ट्र वन विभागाकडे करण्यात आली होती. ज्यात अमेरिकेतील मायकेल होल्स्टन हा एक प्राणी तज्ज्ञ असून त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइल ‘द रिअल टार्झन’ द्वारे वन्यजीव ध्वनिचित्रफीत प्रसारित करतो. दरम्यान, मायकेल आणि त्याच्यासह असलेल्या इतर इन्फ्लूएंजर्सना अटक करण्याची मागणी केली आहे.
तक्रारदार, मुंबईस्थित वन्यजीव प्रेमी आनंद मोहिते यांच्या मते इन्स्टाग्रामवर १.३१ कोटी फॉलोअर्स असलेले होल्स्टन अलीकडेच इंडोनेशियातील बाली येथील मिकेल अपारिसियोसोबत नवी मुंबईत आले होते. ते १४ किंवा १५ मार्च रोजी नाग आणि अजगर हाताळताना दिसल्याचा दावा मोहिते यांनी तक्रारीत केला आहे. या प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित आहेत. दरम्यान, याप्रकरणी या दोघांवर तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील काही हौशी सर्पप्रेमींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मोहितेंनी केली.
आनंद मोहीते यांनी बुधवारी ठाणे वन विभागाकडे (प्रादेशिक) याबाबत तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी होल्स्टन इन्स्टाग्रामवर अजगर आणि नाग हाताळताना दिसत होता तर अपारिसिओही नाग हाताळत होता. ‘समाज माध्यमावर लाईक्स आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी हा एक स्टंट आहे. माझ्या तक्रारीत, मी अधिकाऱ्यांना अशाप्रकारे वर्तणूक करणाऱ्या आणि काही तथाकथित स्थानिक साप बचावकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे,’ असा आरोप मोहिते यांनी केला.
इन्फ्लूएंजरकडून दिलगीरी व्यक्त
तक्रार दाखल झाल्यानंतर इन्फ्लूएंजर मायकेल होल्स्टन यांना पाठवलेल्या ईमेलला उत्तर देताना दिलगीर व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले आहे मला विषारी आणि बिनविषारी साप हाताळण्याचा २० वर्षांहून अधिक काळाचा व्यापक अनुभव आहे. माझ्या देशात मला कायदेशीररित्या विषारी स्थानिक आणि बिगर-स्थानिक प्रजाती पाळण्याचे परवाने आहेत. मी अमेरिकेत नाग आणि अजगर दोन्ही पाळले आहेत. तसेच मी जवळजवळ प्रत्येक खंडातील देश, परिसंस्था आणि वन्यजीवांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार, आणि पर्यटन मंडळांसह काम केले आहे.
वन्यजीव मानव संघर्ष टाळण्यासाठी मी साप पकडतो आणि सुरक्षितपणे जंगलात सोडतो. जर मी कोणतेही नियम किंवा कायदे मोडले असतील तर मी माफी मागतो. परंतु मी फक्त या प्रजातीबद्दल लोकांना शिक्षित करण्याच्या आणि प्राण्याला सुरक्षितपणे मुक्त करण्याच्या हेतूने काम केले आहे. याचबरोबर यापूर्वीही मी भारतातील परवानाधारक सर्पमित्रांसह काम केले आहे. त्यामुळे मला राज्यातील कायदे आणि नियमांची माहिती आहे. मी माझ्या कृत्यांबाबत यानंतर अधिक सावध राहीन, असेही होल्स्टन यांने ईमेल मध्ये नमूद केले आहे.
वनविभागाची भूमिका काय
वनविभाग ज्या ठिकाणी हे घडले त्या ठिकाणाला भेट देऊन येणार आहे. चौकशीनंतर, प्राथमिक गुन्ह्ये अहवाल नोंदवला जाणार आहे. दरम्यान, प्रसिद्धी आणि काही लाईक्ससाठी वन्यजीवांना त्रास देणे चूक आहे. यामुळे वन्यजीवांना धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणेही अडचणीचे होऊ शकते, असे मत ठाण्याचे मानद वन्यजीव अधिकारी पवन शर्मा यांनी व्यक्त केले.