‘इंडिया शायनिंग’ ..भाजपने २००४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राबविलेली प्रचार घोषणा. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या तिसऱ्या व पूर्ण काळ सत्तेवर राहिल्यावर जनतेला दाखविलेली प्रगतीची स्वप्ने व मारलेल्या भराऱ्यांचा भाजपला निवडणुकीसाठी मात्र फारसा उपयोग झाला नाही. अपयश पदरी आले आणि सत्ता गमवावी लागली. देशाची प्रगती जनमानसात व जगभरात दाखविण्यासाठी केलेल्या जाहिरातींसाठी करोडो रुपयांचा चक्काचूर झाला. समाजातील तळागाळापर्यंत भाजप पोचू न शकल्याने विजय मिळाला नाही. ‘इंडिया शायनिंग’ अपयशी ठरल्याची कबुली ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनींही दिली. आता मात्र चहावाल्यापासून प्रत्येक गरीब हा भाजपसाठी ‘व्हीआयपी’ आहे, असे स्पष्ट करीत नरेंद्र मोदी यांनी ‘व्होट फॉर इंडिया’ चा नारा दिला आहे. पक्षाचा पाया अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक केल्यावर सत्तेकडे वाटचाल करता येईल, असा विश्वास भाजपला वाटत आहे. दोन वेळा अल्पकाळ सत्ता मिळाल्यावर अखेर १९९९ मधील निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने यश संपादन केल्यावर भाजपला खऱ्या अर्थाने सत्ता मिळाली. ती पुढील निवडणुकीतही टिकून रहावी, यासाठी प्रमोद महाजन, जसवंतसिंह आदी नेत्यांनी ‘इंडिया शायनिंग’ ची संकल्पना आखली. सरकारी खर्चाने सुमारे ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करून प्रसिध्दीमाध्यमांमध्ये जाहिराती करण्यात आल्या. शेती, उद्योगांसह विविध क्षेत्रांमध्ये देशाने नेत्रदीपक प्रगती केली आहे, २०२० मध्ये भारत आर्थिक महासत्ता होणार, अशा वल्गना करून डोळे दिपतील, अशा चकचकाट करीत प्रचार करण्यात आला. पण उच्चभ्रू, मध्यम वर्गालाही त्या भुलवू शकल्या नाहीत आणि अगदी शहरी भागातही भाजपचा जनाधार कमी झाला व अपयश पदरी आले.
आता कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच, असा चंग बांधून निवडणुकीच्या मैदानात नव्या जोमाने उतरलेल्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘व्होट फॉर इंडिया’ चा नारा दिला आहे. सर्व थरांमध्ये आणि समाजातील तळागाळातील प्रत्येकापर्यंत तो पोचेल, अशा पध्दतीने या नव्या संकल्पनेचा प्रवास होणार आहे. चकचकाटाने जनतेचे डोळे दिपवून आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी सत्तेचा प्रवास सुकर होत नाही, हे बहुधा जाणवल्याने आता बदल झाला आहे. भ्रष्टाचार, महागाई आणि रोजच्या जीवनमरणाचा प्रश्न सोडवेल, तो भला, एवढेच सर्वसामान्यांना कळते, त्यांना खोटय़ा आश्वासनांनीजिंकता येत नाही, हे समजून चुकले असावे. आता ‘व्होट फॉर इंडिया’ चा मंत्रच भाजपला तारणहार ठरणार, असे पक्षाला वाटत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
‘इंडिया शायनिंग’ ते ‘व्होट फॉर इंडिया’
‘इंडिया शायनिंग’ ..भाजपने २००४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राबविलेली प्रचार घोषणा. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या तिसऱ्या

First published on: 23-12-2013 at 01:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will bjp reach power with slogan shift from india shining to vote for india