Nawab Malik Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा (मंगळवार, २९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. काल दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यापैकी एक प्रमुख घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेचा दबाव जुगारून अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म दिला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नवाब मलिकांवर आरोप करणारे, त्यांच्या उमेदवारीला विरोध करणारे भाजपा नेते, शिवसेनेचे (शिंदे) नेते आता मलिकांचा प्रचार करणार का? मलिकांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबधित जमीन व्यवहार व मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिक अनेक महिने तुरुंगात होते. आता ते जामिनावर बाहेर आले आहेत. दरम्यान, मलिकांना सुरुवातीपासून भाजपा व शिवसेनेने (शिंदे) विरोध केला आहे. त्यांच्या उमेदवारीलाही या दोन पक्षांचा विरोध होता. मात्र हा विरोध जुगारून राष्ट्रवादीने (अजित पवार) त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीचे पक्ष आता नवाब मलिकांचा मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये प्रचार करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर आता भाजपाकडून प्रतिक्रिया आली आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: दाऊदचा उल्लेख करत ठाकरे गटानं शेअर केला फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ!
नवाब मलिकांबाबत भाजापाची भूमिका काय?
भाजपाचे आमदार व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायचे असं ठरलं होतं. विषय फक्त नवाब मलिकांच्या उमेदवारीचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) मलिक यांना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबाबत यापूर्वीच आमची भूमिका सांगितली आहे. मी देखील वारंवार भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा एकदा सांगतो की अजित पवारांनी मलिकांना उमेदवारी दिली असली तर भाजपा त्यांचा प्रचार करणार नाही.
हे ही वाचा >> “कॅनडातील फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह”, ट्रुडो सरकारचे गंभीर आरोप
सना मलिकांबाबत भाजपाची वेगळी भूमिका
m
शेलार म्हणाले, भाजपाने मलिकांचा प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही. दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही. दुसऱ्या बाजूला सना मलिक यांच्या प्रचाराबाबत प्रश्न विचारला जात आहे. सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) अणूशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ज्या प्रकरणात नवाब मलिकांना अटक झाली होती, त्या प्रकरणातील सना मलिकांच्या सहभागाबद्दलचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. असा कोणताही पुरावा मिळत नाही तोवर सना मलिक या राष्ट्रवादीच्या (अजित पवार) म्हणजेच महायुतीच्या आणि पर्यायाने भाजपाच्या उमेदवार असतील. आमचा त्यांना पाठिंबा आहे.