लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : मतदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाटणारा कार्यकर्ता, जिल्हा परिषद सदस्यापासून ते आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असेल. विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे खचून न जाता आता रडायचे नाही तर लढायचे आहे, असा स्पष्ट संदेश महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सामान्य कार्यकर्त्यांना दिला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. बिर्ला मातोश्री सभागृह येथे आयोजित पदग्रहण सोहळ्यात त्यांनी आपल्या ध्येयधोरणांबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना माहिती दिली. ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना बाजू ए कातिल मे है,’ अशी सुरुवात करीत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना उभारी दिली. समाज माध्यमाच्या वापराबरोबरच आता रस्त्यावर उतरून लढावे लागेल. टाकीवर चढून ‘शोले’ पद्धतीच्या आंदोलनाला यापुढे थारा दिला जाणार नाही, असे बजावताना भाजप सक्षम नसल्यानेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना फोडावे लागले. काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला अशी टीकाही त्यांनी केली.
आपल्याकडे सक्षम नेतृत्व आहे, मात्र मागील काळात काही कड्या सुटल्या आहेत. आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे, कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री अमित देशमुख, वसंत पुरके, नसीम खान, वर्षा गायकवाड यांची या वेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केले.
नेत्यांच्या शुभेच्छा
● हर्षवर्धन सपकाळ यांना शुभेच्छा देताना प्रभारी रमेश चेन्निथला यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत बनेल, असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणूक काळात विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन चेन्निथला यांनी केले.
● विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशावर भाष्य करताना मोदींची लाट असतानाही २०१४ साली ४४ आमदार विधानसभेला निवडून आले होते. मात्र या विधानसभेत काँग्रेसला अपयश आले याचे कारण आपण बेसावध राहिलो. मात्र आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार असल्याचे सांगितले.
● माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेला काँग्रेसला ८०-८५ जागी विजय मिळेल असे चित्र होते पण भाजपाने मतांची चोरी करून सत्ता आणली. काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही पण मतदान वाढले कसे याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नसल्याचे सांगताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर बोट ठेवले.
काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना शुभेच्छा दिल्या़ यावेळी प्रभारी रमेश चेन्निथला, विजय वडेट्टीवार, मुकूल वासनिक, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते