‘मॅगी’ची जाहिरात केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, पण आपल्याला याबाबत न्यायालयाकडून कोणतीही नोटीस मिळाली नाही. तसेच ‘मॅगी’ची जाहिरात करणे आपण दोन वर्षांपूर्वीच बंद केले आहे. तरीही या प्रकरणामध्ये न्यायालयाला संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मॅगी’मध्ये अधिक प्रमाणात शिसे सापडल्यानंतर या प्रकरणामध्ये ‘मॅगी’ची जाहिरात केल्याप्रसंगी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबद्दल स्पष्टीकरण देताना आतापर्यंत न्यायालयाकडून कोणत्याही स्वरूपाची नोटीस आपल्याला मिळाली नाही. नोटीस मिळाल्यावर आपल्या वकिलांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण मॅगीची जाहिरात दोन वर्षांपूर्वी केली होती. सध्या आपण त्याची जाहिरात करीत नसून त्यांच्याशी आपला कोणत्याही स्वरूपाचा संवाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून त्यांना या प्रकरणात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे.
यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपण खाद्यपदार्थाच्या जाहिरातींबाबत विशेष काळजी घेत असतो आणि त्या संदर्भात आपल्या करारामध्येही विशेष अटींचा समावेश केल्याचे त्यांनी सांगितले. प्रीती झिंटानेही या प्रकरणामध्ये आपली भूमिका ट्विटरवर स्पष्ट केली आहे. बारा वर्षांपूर्वी ‘मॅगी’ची जाहिरात केली होती. त्याच्यासाठी आज या प्रकरणात आपल्याला का गोवले जात आहे लक्षात येत नाही, असे तिने म्हटले आहे.
‘मॅगी’ प्रश्नी न्यायालयाला सहकार्य करण्याची अमिताभ यांची तयारी
मॅगी’ची जाहिरात केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, पण आपल्याला याबाबत न्यायालयाकडून कोणतीही नोटीस मिळाली नाही.
First published on: 04-06-2015 at 05:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will cooperate with what the law says big b on maggi