कर्जमाफीच्या मुद्दय़ावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गाजल्यानंतर पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर या आरोप झालेल्या मंत्र्यांना दुसऱ्या आठवडय़ात लक्ष्य करण्याचा निर्णय विरोधी पक्षाने घेतला आहे. मंत्र्यांवरील आरोपांच्या पाश्र्वभूमीवर सभागृहात राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
कर्जमाफीच्या मुद्दय़ावर पहिल्या आठवडय़ात आक्रमक भूमिका घ्यायची, असे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले होते. पण राष्ट्रवादीने चिक्की मध्येच आणून मूळ मुद्दय़ाला फाटा फोडल्याची भावना काँग्रेसने व्यक्त केली आहे. कर्जमाफीच्या प्रश्नावर झालेल्या चर्चेला सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत. संपूर्ण कर्जमाफी होणार नाही हे जवळपास स्पष्ट असताना काँग्रेसने हा मुद्दा आता सभागृहाच्या बाहेर शेतकरी वर्गात मांडण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी वर्गात भाजपच्या विरोधात या मुद्दय़ाचा वापर काँग्रेसकडून करून घेतला जाणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपची मदत घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अधिवेशनाच्या पहिल्याच आठवडय़ात दुरावा निर्माण झाला. भाजप मंत्र्यांवरील आरोपांवरून राष्ट्रवादी आक्रमक होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. छगन भुजबळ यांच्याविरोधात बांधकाम खात्यातील अनियमिततेबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी ताणून धरणार का, याची उत्सुकता आहे. भाजपच्या विरोधात वातावरण तापविण्याकरिता मंत्र्यांवरील आरोपांचा राजकीय लाभ घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा