मुंबई : हिवाळी अधिवेशन पार पडताच गेले आठवडाभर रखडलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, गृह खात्यावरून एकनाथ शिंदे यांनी ताणून धरले होते, पण हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवले आहे. ह एक प्रकारे भाजपने शिंदे यांना दिलेला धक्का मानला जातो. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकाससह गृहनिर्माण आणि रस्ते विकास ही महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व उत्पादन शुल्क तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महत्त्वाचे महसूल खाते सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह, उर्जा, विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क ही खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यावर गृह खाते मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरला होता. त्यासाठी अनेक दिवस दबावाचे राजकारण केले. अगदी शपथविधीच्या दिवशी अखेरच्या क्षणाला शपथ घेण्यास राजी झाले. तरीही शिंदे यांना गृह खाते मिळू शकलेले नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांची गृह खात्याची मागणी मान्य केली नाही. गृह हे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले खाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवले आहे. २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्रीपदाच्या काळातही गृह खाते हे फडणवीस यांच्याकडेच होते.

हेही वाचा >>>गिरीश महाजन, विखे-पाटील, धनंजय मुंडे यांचे महत्त्व कमी

एकनाथ शिंदे यांची गृह खात्याचा आग्रह मान्य झालेला नसला तरी नगरविकास आणि गृहनिर्माण ही मुंबई, ठाणे व अन्य शहरांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली खाती त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. याशिवाय गेले अनेक वर्षे ते सांभाळत असलेले रस्ते विकास ही खातेही त्यांना पुन्हा देण्यात आले आहे. सर्व महानगरपालिका, नगरपालिकांचा कारभार शिंदे यांच्या अखत्यारीत येईल. याशिवाय गृहनिर्माण हे खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने झोपडपट्टी पुनर्विकास, म्हाडा ही मुंबई, ठाणे व अन्य शहरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या खात्यांचा कारभार शिंदे यांच्याकडे आला आहे.

हेही वाचा >>>रंगभूमी हेच अभिनयाचे मूळ; अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे ठाम प्रतिपादन

दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनाप्रमाणे वित्त व नियोजन हे खाते पुन्हा मिळाले आहे. वित्त खाते ताब्यात असल्याने निधी वाटपात अजितदादांना वरचष्मा राहतो. याशिवाय उत्पादन शुल्क हे ‘चांगला महसूल’ मिळवून खातेही पवारांकडे आले आहे.

भुसेंकडे शालेय शिक्षण

शालेय शिक्षण हे खाते शिंदे यांचे विश्वासू सहकारी दादा भुसे यांच्याकडे सोपविताना उच्च व तंत्रशिक्षण हे खाते भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य सोपविण्यात आले आहे. अतुल सावे यांच्याकडील गृहनिर्माण खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असले तरी त्यांच्याकडे बहुजन विकास, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा हे खाते देण्यात आले आहे. अनेक वर्षाने मंत्रिमंडळात फेरसमावेश झालेल्या गणेश नाईक यांच्याकडे वने ही पूर्वी त्यांनी भूषविलेले खाते पुन्हा आले आहे.

उदय सामंत यांच्याकडे उद्याोग हे खाते कायम ठेवतानाच मराठी भाषा हे नवीन खाते वाट्याला आले आहे. आदिती तटकरे यांच्याकडील महिला व बालकल्याण हे खाते कायम ठेवण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter session cabinet portfolio allocation eknath shinde gets housing along with urban development amy