मुंबई : राज्यभरात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी परतली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर आल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही पारा खाली उतरण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचापासून अति थंड वारे (जेट स्ट्रीम) वाहत आहे. परिणामी उत्तर भारतातून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत थंडीची लाट पोहोचली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने घसरून ८ ते ९ अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नंदुरबार, धुळे जिल्ह्यांच्या काही भागात पहाटेचे तापमान दवांक बिंदूपर्यंत पोहोचले आहे. उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटेचे किमान व दुपारचे कमाल तापमान सरासरीइतकेच आहे.

हेही वाचा : अनौपचारिक कौशल्ये, कामाच्या अनुभवाधारे कोणालाही पदवी

उत्तरेत थंडीची लाट आल्यामुळे आणि पश्चिमी झंझावात सक्रिय राहण्याची शक्यता असल्यामुळे बुधवारपर्यंत (१८ डिसेंबर) थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे, अशी माहिती निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हेही वाचा : दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!

जळगावात पारा आठ अंशांवर

राज्यात मंगळवारी जळगावात ८.० अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिक ९.४, नगर ११.७, पुणे १२.३, छत्रपती संभाजीनगर १२.२, परभणी १२.५, अकोला ११.८सेल्सिअस तापमान होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter updates north maharashtra cold increased and temperature declined in central maharashtra css