मुंबई : एसटी महामंडळाच्या पंढरपूरमधील जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटांचे ‘चंद्रभागा यात्रा बसस्थानक’ व त्याला जोडूनच एक हजार भाविक क्षमतेचे यात्री निवास उभारण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे पंढरपूरमध्ये अद्ययावत बस स्थानक असून या स्थानकातून शेकडो बस राज्यभरात प्रवाशांची नियमित ने-आण करीत असतात. मात्र आषाढी आणि कार्तिकीसारख्या मोठ्या यात्रांसाठी ते बसस्थानक अपुरे आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ११ हेक्टर जागेवर ३४ फलाटांचे भव्य ‘चंद्रभागा यात्रा बस स्थानक’ उभारले आहे. तसेच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविकांची निवासाची अल्प दरात सोय व्हावी, यादृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे एक हजार यात्रेकरू राहू शकतात. येथे एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी दोन सुसज्ज उपहारगृहेही बांधण्यात आली आहेत. एसटी महामंडळाचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी ३३ कोटी रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा… Maharashtra News Live : “अजित पवार महायुतीत शोभत नाहीत, कारण…”, जितेंद्र आव्हाडांचं विधान चर्चेत!
आषाढी आणि कार्तिक यात्रांच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी या बस स्थानकावरून राज्यभरातील विविध ठिकाणी एसटी बस सोडण्यात येणार आहेत. येथे एसटीच्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली असून याबरोबरच सुमारे १ हजार भाविकांची निवाऱ्यासाठी यात्री निवास बांधण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd