मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील माती वाऱ्यामुळे उडून आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असून गेल्या अनेक दिवसांपासून तेथील स्थानिक रहिवासी सामना करत आहेत. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मैदानाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेत येत्या पंधरा दिवसांत मुंबई महानगरपालिकेने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेश महापालिकेला दिले आहेत.
दादर पश्चिमेला असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे विविध खेळांसाठी प्रसिद्ध आहे. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मुले येतात. या मैदानात विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच असतो. धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेक वेळा पालिकेकडे पाठपुरावा केला. दरम्यान, माजी आमदार सदा सरवणकर यांनी ही समस्या प्रत्यक्ष पाहणी करून लक्षात घ्यावी अशी विनंती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच तेथील स्थानिक रहिवासीही उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन येत्या पंधरा दिवसांत महानगरपालिकेने तातडीने निर्णय घ्यावा व कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेश कदम यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच पंधरा दिवसांत पालिकेने कोणतीही कार्यवाही न केल्यास त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत निर्णय घेईल असे सांगितले आहे.
मैदानातील धुळीची समस्या कित्येक दिवसांपासून आहे. मात्र या समस्येवर तोडगा निघू शकलेला नाही. यापूर्वी देखील रहिवासी संघटनेने प्रदूषण मंडळाला पत्र पाठवून यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र त्यावर काहीही तोडगा निघाला नाही. त्यानंतर रहिवासी संघटनेने मैदानात आंदोलनही केले होते.पालिकेच्या विभाग कार्यालयाने दोन वर्षांपूर्वी हिरव्या गवताची पेरणी केली होती. तसेच पर्जन्य जलसंचय यंत्रणा, तुषार सिंचन असेही अनेक प्रयोग करण्यात आले होते.