इंद्रायणी नार्वेकर
मुंबईत ठिकठिकाणी लाखभर ‘मॅनहोल’ असताना पावसाळ्यात पाणी भरणाऱ्या ठिकाणी, तेही केवळ पर्जन्य जलवाहिन्यांच्या प्रवेशिकांवरच संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्याने संपूर्ण शहरात केवळ साडेतीन हजार ठिकाणीच जाळ्या बसवून झाल्या आहेत. संरक्षक जाळ्या नसलेले मलनि:सारण, जल, सांडपाणीचे मॅनहोलही अनेकदा पादचाऱ्यांकरिता तापदायक ठरतात; परंतु पालिकेने उद्दिष्टच मर्यादित केल्याने शहरात ठिकठिकाणी अजूनही मलनि:सारण, जल, सांडपाणीचे मॅनहोल संरक्षक जाळ्यांविना आढळत आहेत.
तीन वर्षांपूर्वी २९ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीत हिंदमाता परिसरात मॅनहोल उघडे राहिल्याने त्यात पडून प्रख्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने आपल्या अहवालात काही शिफारशी केल्या होत्या. त्यात पर्जन्यजल वाहिन्यांच्या मनुष्य प्रवेशिकांना आतून जाळ्या बसवण्याची सूचना करण्यात आली. मॅनहोलच्या झाकणाच्या ५ इंच ते ६ इंच खाली एक जाळीदार झाकण बसवावे, जेणेकरून जर मॅनहोलचे झाकण उघडे राहिले तरी त्यातून पाण्याचा निचरा होईल व जीवितहानी होणार नाही, अशी सूचना करण्यात आली होती.
खरे तर मुंबईत ठिकठिकाणी लाखभर मॅनहोल्स आहेत. हे सर्व मॅनहोल्स विविध खात्यांशी संबंधित आहेत. पर्जन्यजल वाहिन्या खाते, मलनि:सारण खाते, मलनि:सारण प्रचालने खाते, जल अभियंता खाते, सांडपाणी यांसारख्या महापालिकेच्या विविध खात्यांच्या मॅनहोलचे जाळे मुंबईत पसरलेले आहेत. भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे खोलवर असल्यामुळे या मॅनहोलवरील झाकणे उघडी राहिल्यास त्यातून जीवघेणा अपघात होऊ शकतो, असे पालिकेचे म्हणणे असल्याने संरक्षक जाळ्या बसविण्याचे उद्दिष्ट केवळ पर्जन्यजल वाहिन्यांपुरते मर्यादित ठेवण्यात आले.
या कामाअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिथे सर्वात जास्त पाणी भरते अशा ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या मोठय़ा १४२५ मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्यात आल्या. तसेच पावसाच्या दिवसांत ज्या ठिकाणचे मॅनहोल उघडावे लागते अशा ठिकाणीही जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यानंतर विभाग कार्यालयांना त्यांच्या परिसरात आढावा घेण्यास सांगण्यात आले. याअंतर्गत आणखी २००० ठिकाणी अशा जाळ्या बसवण्यात आल्या.
पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर एकूण मॅनहोल – २४,६४७
पहिल्या टप्प्यात बसवण्यात येणाऱ्या संरक्षक जाळ्या – १४२५
पाणी भरण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या हिंदमाता परिसरात एफ दक्षिण विभागात १०० ते १२५ मॅनहोल्स आहेत.