मराठवाडा आणि अन्य भागांतील दुष्काळग्रस्तांविषयी संवेदनशीलता बाळगत यंदा मुंबईकरांनी पाण्याचा अपव्यय टाळून कोरडी धुळवड साजरी केली. यंदा धुळवडीच्या उत्सवावर महापालिकेचे नियंत्रण राहिल्याने यंदा मुंबईकरांनी पाण्याचा एकही टँकर धुळवड खेळण्यासाठी मागविला नसल्याचेही समोर आले आहे. एरवी ठिकठिकाणी रेन डान्स आणि पाण्याने भरलेले फुगे मारणारे नागरिक फुलांच्या, नैसर्गिक रंगांच्या साहाय्याने धुळवड खेळताना दिसून आले.
मुंबई-ठाण्यातील अनेक सोसायटय़ांमध्ये गेल्या आठवडय़ापासून ‘पाणी वाचवा’ संदेश देणारी भित्तिपत्रके लावण्यात आली होती, तर महाराष्ट्रातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव लक्षात घेता मराठी कलाकरांनीदेखील यंदा धुळवड न खेळण्याचा निर्णय घेतला. आयोजकांनी सर्व कलाकारांच्या संमतीने ‘पाणी वाचवा’ मोहिमेत सहभागी होत धुळवडीचा कार्यक्रम रद्द केला. याबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अनेक महाविद्यालयांमध्ये जलजागृती अभियान राबविले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा’ मोहिमेमध्ये सहभागी होत महाराष्ट्रातील भीषण वास्तव स्थानिकांसमोर मांडले. या मोहिमेचा परिणाम यंदा धुळवडीत दिसून आला आणि पाण्याचा वापर न करता मुंबईकरांनी कोरडी होळी साजरी केली.
समाजमाध्यमे, राज्य सरकार, महापालिका यांच्याकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी केवळ रंगांची उधळण करूनच धुळवडीचा आनंद साजरा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा