मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यातील मुख्य आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ओळखत असलेला साक्षीदार बुधवारी फितूर झाला. त्यामुळे खटल्यातील फितूर साक्षीदारांची संख्या ३७ झाली आहे.

यापूर्वी, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या साक्षीदाराचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार, हा साक्षीदार ठाकूर यांच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता आणि त्यांना ओळखत होता. शिवाय, त्याने ठाकूर आणि फरारी आरोपी रामजी कालसंग्रा यांच्यात स्फोटानंतर झालेले संभाषण ऐकले होते. दोघे स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या ठाकूर यांच्या दुचाकीबाबत तसेच अधिक शक्तीशाली स्फोट घडवून आणला नसल्याबाबत बोलत होते.

तथापि, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयासमोर बुधवारी साक्ष देताना या साक्षीदाराने ठाकूर किंवा कालसंग्रा यांना ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच एटीएसला त्याने स्वेच्छेने जबाब दिला नसल्याचा दावाही केला. त्याच्या या साक्षीनंतर तपास यंत्रणेने त्याला फितूर जाहीर करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने त्याला फितूर जाहीर केले.

Story img Loader