मुंबईतल्या एका २१ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आली आहे. या मुलीने आपण नशेत असताना सोशल मीडिया फ्रेंडने बलात्कार केला असा आरोप केला आहे. या पीडितेच्या पोस्टनंतर मुंबईतल्या वरळी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पीडित मुलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित तिला आलेला तो धक्कादायक आणि कधीही विसरता न येणारा अनुभव सांगितला आहे. तसंच त्या रात्री काय काय घडलं हे त्या मुलीने सोशल मीडिया पोस्टवर सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे सगळं प्रकरण १३ जानेवारीचं असल्याची घटना समोर आली आहे. तसंच पीडित मुलीने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव हेतिक शाह असं आहे. १३ जानेवारीला ते दोघं भेटल्याचं या मुलीने म्हटलं आहे. तसंच इंस्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली आणि तिथे ते दोघं बोलायचे असंही या मुलीने सांगितलं आहे. नेमकं काय घडलं ते या मुलीने सविस्तर पोस्ट करुन सांगितलं आहे.

काय आहे या पीडितेची पोस्ट?

पीडिता लिहिते, “मी २१ वर्षांची आहे आणि ही माझी कहाणी आहे. मी हेतिक शाहसह नाईट आऊट करु असा प्लान केला. हेतिक शाह याला मी इंस्टाग्रामवर भेटले होते. आमचे काही म्युच्युअल फ्रेंडस होते. त्यामुळे ठरवलं चला नाईट आऊट करु. पण ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात भयंकर रात्र होती. हेतिक शाह आणि मी सुरुवातीला तर पार्टी करायला गेलो होतो. आमची सुरुवात एका जागेवरुन झाली. त्याच्या काही मित्रांना मी भेटले. त्यानंतर आम्ही बास्टियनला गेलो. तिथे टकीला शॉट्स लगावल्यानंतर मी नशेत होते. पार्टी सुरु होती पण मला त्यावेळी थोडं अस्वस्थ वाटू लागलं आणि एकटंही वाटू लागलं.”

यापुढे पीडिता लिहिते, “मला त्याने त्यानंतर दारु पिण्यासाठी सक्ती केली. मी प्यायले, पण जणू काही डोळ्यांपुढे अंधारी आली. त्यानंतर काय घडलं ते मला लक्षात नाही. मला वाटतं आहे की मला त्या ड्रिंकमध्ये नशेची गोळी देण्यात आली असावी. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा पाहिलं की तो माझ्यावर बलात्कार करत होता. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबलाच नाही. उलट त्याने मला तीन थोबाडीत ठेवून दिल्या. ज्यामुळे मी घाबरले, हेतिक शाहने त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर नेऊन माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याचे मित्र तिकडे आले त्यांनी मला तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला आणि मला धमकावलंही.”

पुढे ही मुलगी लिहिते, “हा सगळा प्रकार घडल्यावर मी माझ्या चुलत भावाला मला या ठिकाणी घ्यायला ये असं सांगितलं. या घटनेचा माझ्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की माझ्या आई वडिलांना त्या रात्री काय घडलं ते सांगू शकले नाही. मात्र माझ्या कुटुंबाला ही बाब समजली तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. त्यांनी मला धीर दिला, ज्यामुळे मी या प्रकरणात FIR करु शकले. हेतिक शाहने दुसऱ्या दिवशी सकाळी माझी माफी मागितली. मात्र त्या माफीला काहीच अर्थ नव्हता. तो फरार झाला. त्याला माहीत आहे त्याने काय केलं. आता १२ दिवस उलटले आहेत आणि तो फरार आहे. हेतिकच्या विरोधात कलम ३७६ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” असं या मुलीने पोस्टमध्ये लिहिलं आहे. इंस्टाग्रामवर punishmyrapist या अकाऊंटवर या मुलीने ही पोस्ट लिहिली आहे. या अकाऊंटवर ही एकमेव पोस्ट आहे ज्यामध्ये पीडितेने आपबिती लिहिली आहे. आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woke up to him raping me mumbai 21 year old girl devastating post for justice scj