वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे गायक अभिजित भट्टाचार्य यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ३४ वर्षीय महिलेने गुरूवारी रात्री मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात अभिजित भट्टाचार्यविरोधात तक्रार दाखल केली. मुंबईतील लोखंडवाला परिसरात अभिजित यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. लोखंडवाला येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गात्सोवाच्या मंडपात हा प्रकार घडला. अभिजित भट्टाचार्य या उत्सवाच्या आयोजकांपैकी एक आहेत. उत्सवादरम्यान याठिकाणी गायक कैलास खेर यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी अंधेरी येथे राहणारी संबंधित महिला याठिकाणी आली होती. यावेळी मंडपात प्रचंड गर्दी झाली जमली होती. त्यामुळे ही महिला स्वत:च्या आसनावरून उठून कार्यक्रम पाहत होती. त्यावेळी जवळच उभे असलेले अभिजित भट्टाचार्य माझ्या अंगाला अयोग्यप्रकारे स्पर्श करत होते. मी याबद्दल त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनीच लोकांसमोर माझ्यावर आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मला तेथील कार्यालयात नेऊन धमकावण्यात आले, असे सदर महिलेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी कलम ३५४ अ, ५०६ आणि ३६ अंतर्गत भट्टाचार्य यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अभिजित भट्टाचार्य यांनी मात्र याबद्दल त्यांना काही माहित नसल्याचे सांगितले. मंडपात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि सुरक्षारक्षक त्यांचे काम करत होते, असे भट्टाचार्य यांनी म्हटले.

Story img Loader