लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः ‘व्हीडीओ लाइक करा आणि कमवा’ असे आमिष दाखवून मालाडमधील २९ वर्षीय महिलेची सात लाख १६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला वास्तुविशारद असून गर्भवती असल्यामुळे तिने नोकरी सोडली होती. त्यामुळे त्या अर्धवेळ कामाच्या शोधात होत्या. त्यांना २ मे रोजी एका अनोळखी क्रमांकावरून एक व्हॉट्सॲप संदेश आला आणि संदेश पाठवणाऱ्याने स्वतःची ओळख आलिया अशी करून दिली. ‘ऑनलाइन काम करण्यात उत्सूक आहात का? फक्त काही युट्यूब व्हीडीओ लाईक करावे लागतील आणि त्यासाठी पैसे मिळतील’, असे आलियाच्या संदेशात नमुद होते. तक्रारदार महिलेने नोकरीसाठी उत्सूकता दाखवल्यानंतर तिला एक चित्रफीत लाईक करण्यास सांगण्यात आले. त्या बदल्यात तिला ५० रुपये मिळाले. नंतर तिने आणखी कामे पूर्ण केली आणि पैसेही मिळाले, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा… मुंबई: पत्नीला पेटवून पतीची आत्महत्या; पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू
पुढे, तिचा मोबाइल क्रमांक टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आला. तिला अधिक कामे करण्यास सांगण्यात आली. ती कामे पूर्ण केल्यावर तिला अधिक पैसे मिळाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून तिला आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. महिला तयार झाल्यानंतर तिला यूपीआयद्वारे एका क्रमांकावर एक हजार रुपये पाठवण्यास सांगण्यात आले. त्याबदल्यात तिला १६०० रुपये मिळाले. त्यामुळे तिने आणखी पैसे गुंतवण्याचे ठरवले.
हेही वाचा… मुंबई: जे.जे. रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया कक्ष होणार अद्ययावत
तिने दिलेल्या यूपीआयद्वारे पाच हजार रुपये हस्तांतरित केले. परंतु यावेळी तिला तिचे पैसे किंवा कमिशन मिळाले नाही. याबाबत तिने विचारपूस केली असता पाच हजार रुपये मिळवण्यासाठी ३० हजार रुपये गुंतवावे लागतील, असे तिला सांगण्यात आले. पण तरीही तिला पैसे मिळाले नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे. ज्यावेळी महिला पैशांबाबत विचारत होती. त्यावेळी तिला मोठी रक्कम जमा करण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे तिने एकूण सात लाख १६ हजार रुपये जमा केली. त्यानंतरही रक्कम न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
महिलेने दूरध्वनी करणाऱ्या आलियाला पोलीस तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. तेव्हा तिचे नाव टेलिग्राम ग्रुपमधून काढून टाकण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर तिने हा सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर ते दोघेही पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ (तोतयागिरी) आणि ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ क (ओळख चोरी) आणि ६६ ड (संगणकाचा वापर करून फसवणूक) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.