मुंबई : गोरेगाव येथील एका अभिनेत्रीच्या घरी चोरी करुन पळून गेलेल्या मोलकरणीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. संगीता बर्मन (२६) असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव असून आरोपी महिलेने अभिनेत्रीच्या घरातून आठ लाखांचे महागडे घड्याळ चोरल्याचा आरोप आहे. चोरी केल्यानंतर आरोपीने आईची तब्येत ठीक नसल्याचे सांगून तेथून पळ काढला होता. अखेर तिला अटक करण्यात यश आले आहे.

हेही वाचा >>> Mumbai Mega Block On Western Line : पश्चिम रेल्वेवर साडेसहा तासांचा ब्लॉक

अभिनेत्री रुही सिंह गोरेगाव येथील रहिवासी आहे. रूहीच्या वाढदिवशी, १२ ऑक्टोबर २०२३ रोजी तिच्या एका मित्राने आठ लाख रुपयांचे रोलेक्स कंपनीचे महागडे घड्याळ तिला भेट म्हणून दिले होते. तिच्याकडे २९ फेब्रुवारी २०२४ पासून संगीता ही घरकामासाठी होती. ती मूळची मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील रहिवासी आहे. एका खाजगी संस्थेमार्फत तिला घरकामासाठी पाठविण्यात आले होते. रुहीला २७ फेब्रुवारी रोजी तिला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असल्यामुळे तिने रोलेक्स कंपनीचे घड्याळ घातले होते. घरी आल्यानंतर तिने ते घड्याळ कपाटात ठेवले होते. १४ मार्चला सकाळी तिला संगीता ही घरातील काम करताना काहीतरी लपवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने विचारणा केली असता संगीता प्रचंड घाबरली होती. तिने काही नाही साफसफाई करत असल्याचे सांगून तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या एकूण हालचालीबाबत रुहीला संशय आला होता.

हेही वाचा >>> Kala Ghoda In Mumbai : काळा घोडा परिसरात शनिवार रविवारी वाहनांना बंदी

दोन तास काम केल्यानंतर संगीताने तिची आई आजारी असल्यामुळे तिला तातडीने गावी जावे लागणार असल्याचे सांगितले. खूप विनंती केल्यानंतर तिला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर दुपारी संगीता तिची बॅग घेऊन निघून गेली होती. रुहीला ४ एप्रिल रोजी तिला एका कार्यक्रमाला जायचे असल्याने तिने घड्याळ घालण्यासाठी कपाट उघडले मात्र, तिला घड्याळ कुठेच सापडले नाही. आई आजारी असल्याचा बहाणा करुन संगीतानेच तिच्या खोलीत साफसफाई करताना घड्याळ चोरून गावी पलायन केले असावे असा तिला संशय आला. त्यामुळे तिने गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संगीताविरुद्ध चोरीची तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन संगीताचा शोध सुरु केला होता. ती तिच्या गावी जबलपूर येथील शहाजपुरी येथे गेल्याचा संशय व्यक्त करुन पोलीस पथक तेथे गेले. गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांचा ससेमिरा चुकवणाऱ्या संगीताला अखेर तिच्या गावातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच घड्याळ चोरल्याचे कबूल केले. त्यानंतर तिला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले.