रायगड जिल्ह्य़ातील घटना; न्यायालयाने खुलासा मागवला

सामाजिक बहिष्कार रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जात असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करत असले तरी रायगड जिल्ह्य़ातील मुरुड येथे या मुद्दय़ातून एका महिलेला मारहाण केल्याची बाब शुक्रवारी उच्च न्यायालयात उघड झाली. विशेष म्हणजे सामाजिक बहिष्काराच्याच प्रकरणातील आरोपींनी हे कृत्य केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आल्यावर न्यायालयानेही त्याची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने पुढील सुनावणीच्या वेळेस या प्रकरणी काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याआधीच्या प्रकरणाच्या तपासाचीही स्थिती काय आहे, याचाही खुलासा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

रायगड जिल्ह्य़ातील काही गावांतील वाळीत टाकलेल्या काही कुटुंबांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जगन्नाथ वाघारे यांनी या कुटुंबीयांच्या वतीने केलेल्या या याचिकेची न्यायालयाने गंभीर दखल घेत सामाजिक बहिष्काराबाबत काहीच न करणाऱ्या राज्य सरकारला फटकारले होते. तसेच या कुप्रथेला आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची सूचना करतानाच आरोपींवर कारवाई करण्याचेही आदेश दिले होते.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणातूनच गेल्या महिन्यात २५ मार्च रोजी एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. शिवाय सामाजिक बहिष्काराच्या आरोप प्रकरणातील आरोपींनीच हे कृत्य केल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने आदेश देऊनही आरोपींवर कठोर कारवाई केली जात नसल्याने त्यांची दहशत अद्याप कायम असल्याचा आरोपही करण्यात आला.

Story img Loader