मुंबई : भाजपचे गोरखपूर येथील खासदार आणि अभिनेते रवी किशन हे आपले खरे वडील असल्याचा दावा करून एका २५ वर्षांच्या तरूणीने शनिवारी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली. तसेच, डीएनए चाचणीची मागणी केली, तर, रवी किशन यांच्या पत्नीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी या तरूणीच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
रवी किशन आणि अपर्णा सोनी यांच्यातील नातेसंबंधातून आपला जन्म झाला आहे. त्यामुळे, मुलगी असल्याचे घोषित करण्याची मागणी शिनोवा शुक्ला हिने अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली. दुसरीकडे, शिनोवा हिने काही दिवसांपूर्वीच रवी किशन यांच्याबाबत उपरोक्त दावा केला होता. त्यानंतर, रवी किशन यांच्या पत्नी प्रिती शुक्ला यांनी लखनऊ येथील स्थानिक पोलिसांत शिनोवा, अपर्णा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा…झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
शिनोवा हिच्या अर्जानुसार, सोनी आणि किशन यांनी १९९१ मध्ये लग्न केले. परंतु, काही वैयक्तिक कारणांमुळे ते फार काळ एकत्र राहू शकले नाहीत. आपला जन्म १९ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला. मात्र, तोपर्यंत किशन यांचे दुसरे लग्न झाले. त्यामुळे, किशन यांना आपण काका म्हणायचे, असा एकत्र निर्णय किशन आणि सोनी यांनी घेतला. दोघांनी आपली आवश्यक काळजी घेतल्याचा दावाही शिनोवा हिने केला आहे.
हेही वाचा…मुंबईकरांची काहिली कमी होणार
तथापि, अलिकडेच शिनोवा आणि सोनी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यासाठी रवी किशन यांची भेट घेतली. तेव्हा, किशन यांनी आपल्याशी गैरवर्तन केले. तसेच, त्यांना भेटण्यास नकार दिल्याचा आरोप शिनोवा हिने अर्जात केला आहे. त्याचप्रमाणे, त्यानंतर आपण पत्रकार परिषद घेतली आणि किशन हे आपले जन्मदाता असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेत काहीही अनुचित घडले नसतानाही किशन यांच्या पत्नीने आपल्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचेही शिनोवा हिने अर्जात म्हटले आहे. तिच्या अर्जावर २५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे, तर तिच्या आईने केलेली याचिका पुढील आठवड्यात सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.