मुंबईः गोरेगाव पूर्व येथील उड्डाणपुलावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) चालकाने भरधाववेगात वाहन चालवून गुरूवारी रिक्षाला धडक दिल्याने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या दोन मुली आणि रिक्षाचालक जखमी झाले आहेत. आरोपी सीआयएसएफमध्ये चालक पदावर कार्यरत असून तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली. याप्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी वनराई पोलिसानी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
धोंडीराम यादव असे या चालकाचे नाव आहे. अपघातग्रस्त वाहन पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून जात होते. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावरून विरुद्ध दिशेला आले व त्याने तेथून जाणाऱ्या रिक्षाला धडक दिली. हा अपघात भीषण होता. त्यात जोगेश्वरीतील रहिवासी हजरा शेख (५५) यांचा मृत्यू झाला.
अपघात कसा झाला?
गुरूवारी पहाटे हजरा आणि तिच्या दोन मुली शाहिन (२०) आणि शिरीन (१७) दक्षिण मुंबईतील नातेवाईकांकडे ईद साजरी करून रिक्षाने घरी परतत होत्या. त्याच वेळी हा अपघात झाला. आरोपी यादवला अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीत तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त वाहनात आणखी तीन जण होते आणि तेही मद्यधुंद अवस्थेत होते.
वाहन दुरुस्तीवरून परतत असताना अपघात
अपघातग्रस्त वाहनात बिघाड झाला होता. ते दुरूस्तीसाठी मिरारोड पूर्व येथे देण्यात आले होते. वाहन दुरुस्त झाल्यानंतर ते सांताक्रुझ येथील सीआयएसएफ कॅम्प येथे घऊन जात असताना हा अपघात झाला. वाहनातील व्यक्तींनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
गंभीर जखमा
मृत महिलेच्या नाक, पाठ, पाय आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली होती. अपघातात जखमी झालेल्या तिच्या मुली आणि रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मुलींची स्थिती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हजराचा पती तिच्या मागे असलेल्या दुसऱ्या ऑटोरिक्षात होते. त्याने अपघात पाहिला आणि लगेच तिघांना रुग्णालयात नेले. त्यावेळी इतर नातेवाईकही रिक्षातून घरी जात होते. हाजराच्या पतीने इतरांना दूरध्वनी करून सांगितल्यावर सर्व घटनास्थळी दाखल झाले.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल अपघातग्रस्त वाहन चालक धोंडीराम यादवविरोधात वनराई पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०६ (१) (निष्काजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत होणे) आणि मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १८५ (मद्यपान करून वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.