मुंबईः भटक्या श्वानाना जेवण देताना बोरिवलीत एका २५ वर्षीय व्यावसायिक महिलेचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचे चित्रीकरण करून समाज माध्यमांवर ती पोस्ट केली. याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी अमन बनसोडे (२८) याच्याविरोधात सोमवारी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> मुंबई:पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
तक्रारदाराचे वडील उच्च न्यायालयात कार्यरत असून ती महिला स्वतः घरातच केक बनवण्याचा व्यवसाय करते. पीडीत महिला भटक्या श्वानांना अन्न देण्याचे काम करते. तिच्या तक्रारीनुसार १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता ती नेहमीप्रमाणे भटक्या श्वानांना खाऊ घालत असताना शेजारच्या भिंतीवर बसलेला बनसोडेने तिच्याकडे पाहत अश्लील भाषेत शेरेबाजी केली. त्याचा जाब तिने विचारल्यावर आरोपीने तिचे केस ओढले आणि तिचा विनयभंग केला. तिला सोडवायला आलेले तिचे आई-वडील आणि भाऊ यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर जखमी कुटुंबावर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी कुटुंबाने एमएचबी कॉलनी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार बनसोडे विरोधात पोलिसांनी विनयभंग, तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.