न्यायालयाचे जे.जे. रुग्णालयाला वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश

मुंबई : अंथरुणात खिळलेल्या पतीचे कायदेशीर पालकत्व आपल्याला देण्यात यावे या मागणीसाठी एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायालयानेही तिच्या याचिकेची दखल घेतली. तसेच, तिच्या पतीच्या वैद्यकीय तपासणीसाठी एक वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश जे.जे. रुग्णालयाला दिले. त्याचवेळी, याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत या रुग्णाच्या मालमत्तेबाबतचे निर्णय ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्तीचा पती रुग्णालयात आणण्याच्या स्थितीत नाही. तो श्वसनाशी संबंधित आजाराने त्रस्त असून अंथरुणाला खिळलेला आहे. त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. शिवाय, वैद्यकीय नलिकेद्वारे त्याला अन्न दिले जाते, असे याचिकाकर्तीचे वकील कौशल ताम्हाणे यांनी न्यायालयाला सांगितले. पतीची वैद्यकीय स्थिती विशद करण्यासाठी याचिकाकर्तीने त्याची वैद्यकीय कागदपत्रे याचिकेसह जोडली आहेत. त्यानुसार, याचिकाकर्तीच्या पतीला फुफ्फुसाचा गंभीर आजार आहे.

शिवाय, त्याला हायपरनेट्रेमियासह तीव्र हायपोक्सिया असल्याचे निदान झाल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. या सगळ्या शारीरिक स्थितीमुळे याचिकाकर्तीचा पती वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणण्याच्या स्थितीत नाही, असेही याचिकाकर्तीच्या वतीने न्यायालयाला सांगितले गेले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने याचिकाकर्तीच्या याचिकेची दखल घेतली. तसेच, तिने केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर तिच्या पतीची वैद्यकीय स्थिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचे एक मंडळ स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले.

या मंडळात मेंदूविकार तज्ज्ञाचाही समावेश करण्याचे न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. मंडळाने याचिकाकर्तीच्या घरी जाऊन तिच्या पतीची वैद्यकीय तपासणी करावी. तसेच, त्याच्या स्थितीचा वैद्यकीय अहवाल २२ एप्रिलपूर्वी सादर करावा आणि तोपर्यंत याचिकाकर्तीच्या पतीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची स्थिती ‘जैस थे’ ठेवावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी, प्रकणातील अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून सुनावणी तहकूब केली.