मंदिराच्या चौथऱ्यावरील बंदीच्या निर्णयाला वेगळय़ा प्रकारे प्रत्युत्तर
दहीहंडीला थर किती लावायचे किंवा बालगोविंदांना थराला घ्यायचे की नाही, यावरून काथ्याकूट होत असताना महाराष्ट्रातील पहिल्या महिला गोविंदा पथकाने यंदा शनिशिंगणापूर येथे दहीहंडी फोडण्याचा निश्चय केला आहे. शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. मात्र तेथे दहीहंडी फोडून महिलाही सक्षम असल्याचे दर्शन घडविण्यासाठी हे गोविंदा पथक शनिशिंगणापूरला जाणार आहे.
दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा असणार की नाही, १८ किंवा १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडता येणार की नाही, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित असल्याने मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथके संभ्रमात आहेत. या संदर्भात १७ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. त्यामुळे समस्त गोविंदा पथकांचे लक्ष न्यायालयाकडे लागले असून माखनचोरांचा सरावही थंडावला आहे. मात्र त्याच वेळी महाराष्ट्रातील पहिले महिला गोविंदा पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रबोधन कुर्ला शाळेच्या गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाने यंदा शनिशिंगणापूरमध्ये दहीहंडी फोडण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी हे गोविंदा पथक आदल्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्य़ात रवाना होणार आहे. अहमदनगरमधील देवगड गावातील दत्तमंदिरात २४ ऑगस्टला मुक्काम ठोकून हे पथक दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शनिशिंगणापूरला रवाना होईल. देवगडमधील दत्तमंदिर व्यवस्थापनाने परवानगी दिल्यास कृष्ण जन्माष्टमीनिमित्त एक छोटा कार्यक्रम आयोजित करून मध्यरात्री १२च्या सुमारास या पथकातील गोपिका दहीहंडी फोडणार आहेत.
शनिशिंगणापूरमधील प्रतिष्ठितांपैकी एक असलेल्या शंकरराव गडाख यांनी या पथकाला आमंत्रित केले आहे. तसेच रावसाहेब खेवरे हेही या पथकासाठी एक मानाची दहीहंडी बांधणार आहेत. तसेच नगरच्या महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम, सचिन जाधव आणि अनिल शिंदे आदी मान्यवरांनीही नगरमध्ये मानाची दहीहंडी बांधण्याची तयारी दर्शविली आहे. दिवसभर ठिकठिकाणच्या मानाच्या दहीहंडय़ा फोडून झाल्यानंतर हे पथक संध्याकाळी शनिशिंगणापूरला रवाना होणार असून मुंबईमधील दहीहंडी उत्सवाच्या परंपरेचे दर्शन या पथकातील गोपिका शनिशिंगणापूरवासीयांना घडवणार आहे.
महिलाही दहीहंडी फोडण्यासाठी सक्षम आहेत हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने १९९६ मध्ये प्रबोधन कुला शाळेचे सर्वेसर्वा भाऊ कोरगावकर आणि शलाका कोरगावकर यांनी गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर हळूहळू महिला गोविंदा पथकांची संख्या वाढू लागली आणि महिलांमध्येही उंच दहीहंडी फोडण्याची चुरस सुरू झाली. या जीवघेण्या चुरशीपासून दूर राहण्याचा निर्णय या दोघांनीही घेतला आणि केवळ पाच थरांपेक्षा उंच दहीहंडी फोडायची नाही असा दंडक त्यांनी घातला. त्याचबरोबर दरवर्षी महाराष्ट्रातल्या अथवा अन्य राज्यातील रहिवाशांना दहीहंडी उत्सवाचे दर्शन घडविण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार गेली काही वर्षे हे पथक निरनिराळ्या राज्यांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी रवाना होत आहे. आतापर्यंत द्वारका, डाकोर, उडुपी, जयपूर, उजैन नि:पाणी, अमृतसर, वाराणसी आदी ठिकाणी या पथकातील गोपिकांनी दहीहंडी फोडून तेथील रहिवाशांना मानवी थर रचण्याचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घडविले.
यंदा १५० महिला आणि मुली दहीहंडी फोडण्यासाठी शनिशिंगणापूरला जाणार आहेत. कोणताही नवा वाद व्हावा या उद्देशाने नव्हे, तर या वादावर सामंजस्याने पडदा पडावा यासाठी हे पथक शनिशिंगणापूरला दहीहंडी फोडायला जाणार आहे.
– भाऊ कोरगावकर, गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाचे सर्वेसर्वा