मुंबई : पुण्यासह राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये थैमान घालणाऱ्या गुइलेन-बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण अंधेरी (प.) येथील सोनार चाळीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला झाली आहे. या ६४ वर्षीय महिलेला ५ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये सापडलेला हा पहिला जीबीएसचा रुग्ण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अंधेरी पश्चिमेला असलेल्या मालपा डोंगरी येथील सोनार चाळीत राहणाऱ्या ६४ वर्षीय लक्ष्मी पांडुरंग जाधव यांना १५ दिवसांपूर्वी ताप आणि डायरियाचा त्रास सुरू झाला होता. तसेच त्यांना चालताना त्रास होत होता. मात्र मागील तीन दिवसांपूर्वी त्यांना पक्षाघात झाला. त्यांना ५ फेब्रुवारी राजी अंधेरीतील मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. विविध तपासण्या करून तिच्यावर तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या मेंदूमध्ये पांढरे डाग दिसत आहेत. त्यांच्यावर प्लाझ्मा उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. या पद्धतीच्या अजून चार फेऱ्या शिल्लक आहेत, अशी माहिती सेव्हन हिल रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईमध्ये सापडलेला हा पहिला जीबीएसचा रुग्ण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी मुंबईमध्ये अधूनमधून जीबीएसचे नियमित रुग्ण सापडत असल्याने हा पहिला रुग्ण असण्याची शक्यता रुग्णालयातील अधिकाऱ्याकडून फेटाळण्यात आली आहे.

राज्यामध्ये अद्यापपर्यंत जीबीएसचे १७३ संशयित रुग्ण सापडले असून, यापैकी १४० रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जीबीएसमुळे एकाचा मृत्यू झाला असून, पाच जणांच्या मृत्यूची संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. राज्यातपुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सर्वाधिक १३४ रुग्ण सापडले असून, पिंपरी चिंचवडमध्ये २२, पुणे ग्रामीण २२ व अन्य जिल्ह्यांमध्ये आठ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ७२ जणांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.

तर ५५ रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये असून, २१ रुग्ण जीवन रक्षक प्रणालीवर आहेत. राज्यात सापडलेल्या रुग्णांमध्ये ० ते १९ वयाेगटामध्ये ४६ रुग्ण, २० ते २९ वयोगटात ३८ रुग्ण , ३० ते ३९ वयोगटात २१ रुग्ण, ४० ते ४९ वयोगटात २२ रुग्ण, ५० ते ५९ वयोगटात २५ रुग्ण, ६० ते ६९ वयोगटात १५ रुग्ण, ७० ते ८९ वयोगटात ६ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये सापडलेल्या संशयित जीबीएस रुग्णाचा पुण्यातील रुग्णांशी काहीही संबंध नसून, या महिलेने कुठेही प्रवास केला नसल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

Story img Loader