मुंबई : आरे वसाहतीत बिबट्याकडून मानवी हल्ले सुरूच असून नुकताच बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून ही महिला बचावली असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या महिलेवर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनिट क्रमांक १५ येथे दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. यात या चिमुरडीचा मृत्यू झाला. त्यानंतर याच परिसरात रात्री वेळी एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात व्यक्ती बचावली होती. बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या मागणीनुसार वन विभागाने पिंजरे लावून दोन बिबट्यांना जेरबंद केले आहे. मात्र तरीही बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. दरम्यान या परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर असून या बिबट्याचा शोध वन विभाग घेत आहे.
हेही वाचा : अस्लम शेख यांच्या नव्या मागणीमुळे टिपू सुलतान मैदानाचा पुन्हा वाद
आरे परिसरातील आदर्श नगर येथून संगीता गुरव शुक्रवारी आपल्या घरी जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संगीता बचावल्या. मात्र त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी ट्रॉमा केअर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.