विरार लोकलमध्ये अज्ञात इसमाच्या हल्ल्यात जखमी झालेली रूपाली शेट्टी या तरुणीला उपचारनानंतर घरी सोडण्यात आले. महिलांच्या डब्यात एक अज्ञात इसम पत्रा घेऊन चढला होता. तो पत्रा लागून जखमी झाल्याचे रूपालीने सांगितले. मात्र तिने तक्रार दिली नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री चर्चगेटहून सुटलेली लोकल ९ वाजून ४७ मिनिटांनी दादर स्थानकात आली. या गाडीत रुपाली ही मुंबई सेंट्रल स्थानकात महिलांच्या दुसऱ्या डब्यात चढली होती. ती गर्भवती असल्याने उलटी होईल म्हणून दारात बसली होती. दादर स्थानकातून गाडी सुरू असताना एक अज्ञात इसम पत्रा घेऊन या डब्यात चढला. डब्यात प्रचंड गर्दी होती. इतर महिलांनी त्या इसमाला विरोध केला. माहीम – माटुंगा दरम्यान इतर महिलांसोबत झालेल्या झटापटीत हा पत्रा रूपालीला लागल्याने ती जखमी होऊन डब्यात खाली पडली. या गोंधळामुळे डब्यातील महिला प्रवाशांमध्ये घबराट पसरली. हल्ला झाला म्हणून महिला ओरडू लागल्या आणि त्यानी साखळी ओढून लोकल थांबविली. लोकलने वेग कमी केल्यावर तो इसम डब्यातून उडी मारून पळून गेला. इतर महिला प्रवाशांनी स्कार्फ बांधून रूपालीच्या हातावरील रक्तस्त्राव थांबविला. तिला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची सोनोग्राफीही करण्यात आली. भाइंदर येथे राहणाऱ्या रूपालीला उपचारानंतर सोडून देण्यात आले. आपली कुणाविरूद्ध तक्रार नसल्याचे रूपालीने पोलिसांना सांगितले. पत्र्यासारखी वस्तू पाहून सुरुवातीला चॉपरचा हल्ला झाल्याचे डब्यातील महिलांना वाटले होते, असे त्रिवेदी यांनी सांगितले. तो इसम अजाणतेपणे गाडीत चढला की हेतुपुरस्सर, हे स्पष्ट झालेले नाही.