‘आई’ झाल्याशिवाय स्त्रीला पूर्णत्व नाही, या अघोषित सामाजिक वृत्तीतून तिने ‘आई’ व्हायचा ध्यास घेतला.. दुसरे लग्न करूनही मूल होईना.. अखेर तिने वेगळाच मार्ग पत्करला.. पोटाला चिंध्या बांधून गरोदर असल्याचे तिने पतीलाही भासवायला सुरुवात केली..  हे सोंग वठवतानाच ‘बाळंत’ होण्याचा मार्गही ती रोज शोधत होती.. हा मार्ग होता एखाद्या अर्भकाच्या अपहरणाचा!
मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या ‘ती’ची ही कहाणी.. अनेक ठिकाणी तिने अर्भक पळवण्याचा प्रयत्नही करून पाहिला, पण त्यात ‘यश’ येत नव्हते. २३ एप्रिलला ती छत्रपती शिवाजी टर्मिनसला आली तेव्हा तिला ‘तिचे बाळ’ दिसले! किरकोळ कामे करून उदरनिर्वाह करणारे एक कुटुंब हैदराबादला जाण्यासाठी तिथे आले होते. पती, पत्नी ३ वर्षांची मुलगी आणि सोबत ४ महिन्यांची तान्ही मुलगी असे हे कुटुंब होते. पैशांचा बंदोबस्त न झाल्याने ते फलाटावरच झोपून होते. त्यावेळी या महिलेचे लक्ष या तान्ह्य़ा मुलीकडे गेले. कुणी पाहत नाही याचा फायदा घेत तिने त्या मुलीला पळवले. ‘मी रस्त्यात बाळंत झाले’,  असे पतीला खोटं सांगून ती  घरी आली. मात्र, पोलीस दाराशी येताच बिंग फुटले.
मुलीच्या अपहरणाची तक्रार संबंधित जोडप्याने रेल्वे पोलिसांकडे केली. पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त (मध्य) रुपाली खैरमोडे-अंबुरे यांनी पथक स्थापन केले. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक महिला बाळाला घेऊन जाताना दिसली. पण सीसीटीव्ही स्पष्ट नव्हते. तरीही सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे आणि त्यांच्या पथकाने टॅक्सीचालकांकडे चौकशी सुरू केली. एका टॅक्सीचालकाने अशा महिलेला आपण मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीत सोडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक माणिक साठे, योगेंद्र पाध्ये, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष इक्के, रोमण आदींचे पथक तेथे पोहोचले. म्हाडाच्या ११०० इमारतींमधून महिलेचा शोध घेणे कठीण काम होते. एका घरातील महिला रस्त्यात बाळंत झाल्याची माहिती मिळाली आणि २४ तासांत गुन्ह्य़ाचा छडा लागला.

Story img Loader