मुंबई : महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह पलंगात लपवल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली. मृत व्यक्तीचे नाव नसीम खान असून चारित्र्याच्या संशयावरून तो पत्नीला शारिरीक व मानसिक त्रास देत होता. त्रासाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने खानची गळा दाबू हत्या केली.
रुबिना खान (२२) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फीकार फारुकी (२१) यालाही अटक केली आहे. साकीनाका परिसरातील एका घरातून दुर्गधी येत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी सोमवारी सकाळी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील पलंगाखाली नसीमचा मृतदेह सापडला. साकीनाका पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी शेखचे वडील अजगरअली शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
नसीमचे २०१७ मध्ये रुबिनासोबत लग्न झाले होते. पूर्वी ते पवईच्या आयआयटी चर्चमध्ये राहात होते. नसीम हा कपडे शिवण्याचा व्यवसाय करीत होता. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. कुटुंबातील सदस्यांनी दोघांमधील वाद सोडवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यातील वाद थांबला नाही. दोघेही १२ जुलै रोजी यादव नगर येथील सरवर चाळ येथे वास्तव्यासाठी आले होते.
नसीमच्या वडिलांनी १४ जुलै रोजी त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला. प्रकृती ठिक नसल्याने नसीम झोपल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. नसीमचा मोबाइल १५ जुलैपासून बंद होता. त्यामुळे त्याचे वडील चौकशीसाठी आले असता खोलीचा दरवाजा बंद असल्याने ते परत गेले. खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला. यावेळी नसीमचा मृतदेह पलंगाध्ये आढळला. शेजाऱ्यांची चौकशी केली असता त्याची पत्नी रुबिना बेपत्ता होती. शिवाय तिचे दोन्ही मोबाइल बंद होते. मृतदेहाच्या गळ्याभोवती व्रण असल्याचे निदर्शनास आले. नसीमची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून रुबिना व फारुकी या दोघांना अटक केली. चारित्र्याच्या संशयावरून पती शारिरीक व मानसिक त्रास देत असल्यामुळे फारुकीच्या मदतीने नसीमची गळा दाबून हत्या केल्याचे रुबीनाने चौकशीत कबुल केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.