आपल्या महिला सहकाऱ्याच्या पर्समधील सव्वापाच लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा हार चोरल्याप्रकरणी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्या मीनाक्षी सिंग यांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामीनावर मुक्तता झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी एका भोजपुरी चित्रपटाचा खेळ पाहण्यासाठी चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या सदस्या मीनाक्षी सिंग (४५), किरण श्रीवास्तव अन्य तीन सदस्यांसह चर्चगेट येथील इरॉस चित्रपटगृहातील छोटय़ा हॉलमध्ये गेल्या होत्या. यावेळी किरण श्रीवास्तव यांच्या पर्समध्ये दोन हिऱ्याच्या अंगठय़ा आणि एक हार असा ऐवज होता. चित्रपटाचा खेळ संपल्यावर पर्समध्ये हार नसल्याचे लक्षात आल्यावर चित्रपटगृहातील कर्मचारी आणि अन्य सदस्यांसह किरण श्रीवास्तव यांनी तो हॉलमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. पण हार सापडला नाही. दागिने घरीच राहिले असतील अशी शंका काहींनी उपस्थित केली. त्यामुळे किरण श्रीवास्तव यांनी घरी जाऊन हाराचा शोध घेतला असता तेथेही तो सापडला नाही. अखेर त्यांनी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी हॉलमधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात मीनाक्षी सिंग यांच्या हालचाली संशयास्पद जाणवल्या. या प्रकरणी त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. मीनाक्षी सिंग यांच्या घरातून हिऱ्याचा हार हस्तगत करण्यात आला. तसेच त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Story img Loader