मुंबई : दादर रेल्वे स्थानकात मद्यधुंद व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. मात्र या घटनेनंतर प्रवाशांनी महिलेचा विनयभंग करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला. दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित महिला गृहिणी असून ती रेल्वे पकडण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ – ७ च्या दरम्यान दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वर थांबली होती. त्यावेळी फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्रवासी लोकलची वाट पाहत होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

फलाट क्रमांक ८ वर असलेल्या गर्दीचा आरोपीने गैरफायदा घेतला. तो महिलेच्या अगदी जवळून गेला आणि त्याने तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने तत्काळ आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांनी आरोपीला पकडले. संतप्त प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी आरोपीला दादर रेल्वे चौकीत नेले आणि त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमिदुल्ला मुख्तार शेख (२९) असे अटक आरोपीचे नाव असून तो कुर्ल्यातील इंदिरा नगर परिसरात वास्तव्याला आहे. आरोपी लहान-मोठे कामे करून स्वत:चा उदरनिर्वाह करतो. तो मूळचा झारखंडमधील रहिवासी आहे. याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभिमीवर रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त तैनात आला आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून ही विशेष पथके रेल्वे स्थानकांवर विशेष गस्त घालत आहेत. महिला प्रवाशांची छेडछाड व त्रास देणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे धावत्या रेल्वेगाड्यांवर पाण्याचे फुगे मारू नये यासाठी संबंधित रेल्वे पोलीस ठाण्यांमार्फत रेल्वे रूळानजिकच्या झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच रेल्वे स्थानकांवरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यातूनही प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रेल्वे रूळालगत वस्ती असलेल्या शीव, वडाळा, कुर्ला आणि पश्चिम- रेल्वेच्या वांद्रे, माहीम आदी रेल्वे स्थानकांवर आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रेल्वेवर फुगे व पाणी फेकणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पथकांना देण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यादृष्टीनेही विशेष लक्ष ठेवण्याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.