मुंबई : वस्तू देण्यासाठी आलेल्या डिलेव्हरी बॉयने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार गिरगाव परिसरात घडला. याप्रकरणी वि. प. रोड पोलिसांनी आरोपीला शनिवारी अटक केली. आरोपी चेंबूर येथील रहिवासी असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

शाहरूख शेख मोहम्मद शेख (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो चेंबूर येथील रहिवासी आहे. आरोपी खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून कामाला आहे. पीडित २८ वर्षीय महिला कुटुंबियांसोबत गिरगाव येथे राहते. २१ मार्चला त्यांनी काही वस्तू ऑनलाईन ऑप्लिकेशनद्वारे मागवल्या होत्या. पण बराच वेळ झाला, तरी डिलेव्हरी बॉय न आल्यामुळे त्यांनी दोन वेळा आरोपी डिलेव्हरी बॉयला दूरध्वनी केला होता. पण नेटवर्क नसल्यामुळे आरोपीशी व्यवस्थित बोलणे झाले नाही. अखेर आरोपी रात्री महिलेच्या घरी वस्तू घेऊन आला.

महिलेने दरवाजा उघडला असता आरोपी अश्लील स्थितीत उभा होता. त्यामुळे महिला घाबरली व घरात पळून गेली. तिने घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यावेळी पती आरोपीच्या मागे धावला. आरोपी त्यावेळी उद्वाहनाची वाट पाहत उभा होता. त्याने आरोपीला मारहाण केली. पण आरोपी तेथून धक्का मारून पळून गेला. महिलेने तात्काळ याप्रकरणी आरोपीच्या कंपनीला ऑनलाईन तक्रार केली. त्यांनी आरोपी डिलेव्हरी बॉयला ४८ तासांत कामावर उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण तेव्हापासून तो कामावर अनुपस्थित होता. याप्रकरणी महिलेने वि. प. रोड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी गावदेवी पोलिसांच्या हद्दीतील कॅनडी ब्रीज येथून अटक केली.

विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबई पोलिसांच्याआकडेवारीनुसार, २०२४ मध्ये मुंबईत १०५१ बलात्काराच्या घटना घडल्या, तर २०२३ मध्ये ९७३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. गंभीर बाब म्हणजे परिचीत व्यक्तीकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेत गुन्ह्याची उकल होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांवर घटले आहे. याशिवाय विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही गेल्यावर्षी वाढ झाली आहे.

शहरात २०२३ मध्ये २०५५ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यात २०२४ मध्ये वाढ होऊन २३९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान २०२३ व २०२४ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यांत आरोपी अटक होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे.शहरातील महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्येही वाढ झाली असून मुंबई २०२३ मध्ये महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११६७ गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये याच काळात १२३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.