बोरिवली-कांदिवलीदरम्यानची घटना; प्रवाशांकडून आरोपीला बेदम चोप
पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोडहून चर्चगेटला जाणाऱ्या धावत्या लोकलमध्ये भरदिवसा एका गर्दुल्ल्याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. राजेश विश्वकर्मा (वय २५) असे या आरोपीचे नाव असून, तो कांदिवली येथील पोईसरचा रहिवाशी आहे. या प्रकरणात लोकलमधील महिलांसह रेल्वे प्रवाशांनी गर्दुल्ल्याला चोप देत रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वे पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दुपारी अडीच्या सुमारास बोरिवली व कांदिवली स्थानकांदरम्यान ही घटना घडली. चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलमधील महिलांच्या प्रथम श्रेणीतील डब्यातून एक महिला प्रवास करत होती. गाडी बोरिवली स्थानकात येताच एक गर्दुल्ला या डब्यात शिरला. त्याने या महिलेचा विनयभंग केला. यावर या महिलेने आरडाओरडा केल्यावर डब्यातील इतर महिला तिच्या मदतीला धावून आल्या.गाडीतील काही महिलांनी साखळी ओढून गाडी कांदिवलीला थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु गाडी थेट अंधेरीला येऊन थांबली. यानंतर महिलांच्या डब्यातून आरडाओरडा ऐकू आल्याने इतर प्रवाशांनी डब्याच्या दिशेने धाव घेतली. प्रवाशांनी या गर्दुल्ल्याला पकडून जबर चोप दिला आणि त्याला अंधेरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे रेल्वेतील सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकलच्या प्रवासात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अनेकदा महिलांच्या डब्यात सुरक्षारक्षक दिसत नसल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.