चप्पल व जीन्समध्ये लपवून कोट्यावधी रुपयांच्या सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या परदेशी महिलेला सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून मंगळवारी अटक केली. महिलेकडून सव्वा दोन किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई : दुचाकी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर चाकूने हल्ला
मार्यान मोहम्मद नाभसिर (२५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती नायजेरियातील रहिवासी आहे. नाभसिर मंगळवारी नायजेरिया येथून इथोपिया मार्गे मुंबईत आली होती. तिच्याबाबत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे तिला थांबवून तपासणी केली असता तिच्या जीन्स छुपा कप्पा व चपलेच्या सोलमध्ये विशिष्ट जागा तयार करून त्यात सोने लपवले असल्याचे लक्षात आले. तपासणीत तिच्याकडे सोन्याच्या २५ लगडी व सोन्याचे दागिने सापडले. त्यांचे वजन २२९६ ग्रॅंम असून किंमत एक कोटी १० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> धक्कादायक: मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा निर्घृण खून, चाकूने केले वार
सर्व सोने जप्त करण्यात आले असून महिलेविरोधात सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेले सोने २२ कॅरेटचे आहे. त्यातील सोन्याच्या लगडी सुमारे सव्वा दोन किलो वजनाच्या आहेत. या महिलेकडून सुमारे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. जीन्समध्ये विशेष कप्पा तयार करून त्यात सोने लपवण्यात आले होते. चपलेतही सोने लपवले होते, असे सूत्रांनी सांगितले. पंचनामा करून ते सोने ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी महिलेने प्रथमच सोन्याची तस्करी केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले. याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करत आहे.