डॉ. निशिगंधा वाड शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्वस्त निधीतर्फे नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील महिलांना ‘स्त्री शक्ती अभियान’ तर अडचणींवर मात करून शैक्षणिक यश मिळविलेल्या ११ मुलींना ‘समर्थ बालिका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच या मुलींना शिष्यवृत्तीही प्रदान करण्यात आली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई यांच्या जीवनावरील ‘मी वेणू बोलतेय’ या लघुपटाचे प्रकाशनही या कार्यक्रमात झाले. सुजाता मोरे यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून या वेळी लघुपटाचा काही भाग उपस्थितांना दाखविण्यात आला.   राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार प्रकाश बिनसाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, निर्मात्या रश्मी शर्मा, शिक्षणतज्ज्ञ कल्पना परब, पत्रकार प्रगती बाणखेले आणि स्त्री चळवळीतील कार्यकर्त्यां रागिणी चंद्रात्रे यांचा तसेच विविध अडचणींवर मात करून शैक्षणिक यश मिळविलेल्या अकरा बालिकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. शालेय स्तरावर असलेल्या करिष्मा लोळे आणि सई विश्वास पाटील यांनी पोहोण्याचे राष्ट्रीय स्तरावरचे यश मिळविले होते. तर देवका ही अंध विद्यार्थिनी ब्रेल वाचनात अतिशय तरबेज होती. या यशस्वी बालिकांना सुरेख स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती   देण्यात आली.  
या वेळी बोलताना टोपे म्हणाले की, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि अडचणींवर मात करून यश मिळविलेल्या मुली या दोघींच्या कर्तृत्वाला सलाम करणारा हा सोहळा आहे. बिकट परिस्थितीतूनही आपले शिक्षण पूर्ण करून यश मिळविलेल्या या मुलांचा सत्कार इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. विश्वस्त निधीच्या डॉ. निशिगंधा वाड यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा