AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये एआयचा बोलबाला दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणेच एआयच्याही फायद्या-तोट्यांवर आता विचार होऊ लागला आहे. यासंदर्भात नुकत्याच मुंबईत घडलेल्या एका घटनेमुळे एआयच्या तोट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका ५८ वर्षीय प्राध्यापक महिलेला एआयचा वापर करून एका भामट्यानं चक्क १ लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून त्यावर पोलिसांकडून अधिक तपास चालू आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई पोलिसांकडे या महिला प्राध्यापिकेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. मुंबई पोलीसात पोलीस निरीक्षक असल्याचं सांगून या व्यक्तीने हा फोन केला होता. ‘मी इन्स्पेक्टर विजय कुमार बोलतोय. तुमच्या मुलाला आम्ही एका प्रकरणात ताब्यात घेतलं आहे, तातडीनं १ लाख रुपये ट्रान्सफर करा, नाहीतर त्याला अटक केली जाईल’, असं समोरच्या व्यक्तीने महिलेला सांगितलं. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने त्यांच्या मुलाला फोन केला. पण दोन वेळा फोन करूनही मुलानं फोन न उचलल्यामुळे त्यांना खात्री पटली की त्यांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याला अटक होऊ शकते.
या महिला प्राध्यापिकेनं लागलीच समोरच्या व्यक्तीने दिलेल्या दोन स्वतंत्र खात्यांवर १ लाख रुपये ट्रान्सफर केले. पण पुढच्या काही मिनिटांत त्यांना मुलानं मिस्ड कॉल्स पाहून फोन केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी जुहू पोलीस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल केली.
कशी झाली फसवणूक?
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सदर महिला प्राध्यापिका व त्यांच्या मुलाची सर्व माहिती सोशल मीडियावरून मिळवली. या माहितीचा वापर करून त्यांना फोन करण्यात आला व मुलाविषयी धमकावण्यात आले. यानंतर घाबरलेल्या अवस्थेतील महिला प्राध्यापिकेनं लागलीच १ लाख रुपये ट्रान्सफर केले.
बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू
दरम्यान, हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर महिला प्राध्यापिकेनं पैसे ट्रान्सफर केलेली दोन बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दोन स्वतंत्र बँकांमध्ये ही खाती असून त्या दोन्ही बँकांशी संबंधितांची माहिती काढण्यासाठी संपर्क करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारे एआयचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले असून नागरिकांनी अशा फसवणुकीसंदर्भात सतर्क राहायला हवं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.